भिवंडी : भिवंडीतील शिक्षा सुधार समितीच्या वतीने भिवंडी मनपा मुख्यालयासमोर आयोजित केलेल्या ‘मेरी पाठशाला’ आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एका १४ वर्षांच्या विद्यार्थ्याने ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. पोलिसांनी १७ आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांचे जबाब नोंदवून घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
घोषणा देणाऱ्या अल्पवयीन मुलाचा शोध घेऊन त्याचा जबाब नोंदवून त्यास बाल न्यायालयासमोर हजर करू, अशी माहिती शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतन काकडे यांनी दिली. विस्डम अकादमी इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांसह पालकांचे वर्तन चांगले नसल्याने सहा विद्यार्थ्यांना शाळेतून काढले. त्यांचे दाखले पोस्टाद्वारे घरी पाठविले. यामध्ये तीन विद्यार्थी शिक्षण हक्क अधिनियमाद्वारे ऑनलाइन प्रवेश घेतलेले होते.
पालिका प्रशासनाने शाळा व्यवस्थापनावर कारवाई करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विजय कांबळे यांच्या नेतृत्वात पालिका मुख्यालयासमोर गुरुवारपासून ‘मेरी पाठशाळा’ हे आंदोलन सुरू होते. ५ जानेवारीपर्यंत आंदोलन सुरू राहणार होते. सोमवारी विद्यार्थी व पालकांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना १४ वर्षांच्या विद्यार्थ्याने ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. या घोषणांमुळे आंदोलन सुरू असलेल्या परिसरात खळबळ उडाली. या घोषणेनंतर आयोजकांनी व घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याने माफी मागितली. सहायक पोलिस आयुक्त सुनील वडके यांनी प्रकरणाची दखल घेतली आहे.