भिवंडी: भिवंडीतील ग्रामीण भागात नवीन ठाणे बनवणार असून या नवीन ठाण्यात नागरिकांना स्वस्त व हक्काची घरे मिळवून देण्याचे अमिष दाखवून सुमारे ४ हजारांहुन अधिक गरीब नागरिकांची तब्बल १७५ कोटी रुपयांहुन अधिकची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीत समोर आला आहे. याप्रकरणी नागरिकांनी केलेल्या तक्रारी अर्जांची दखल राज्याच्या गृह विभागाने घेत व्यावसायिकाची मालमत्ता सील करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र राज्य शासनाच्या आदेशानंतर ही गुंतवणूकदारांना कोणताही मोबदला अथवा रकमेचा परतावा मिळाला नसल्याने गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासह लवकरात लवकर परत मिळावे अशी मागणी या गुंतवणूकदारांनी भिवंडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
भिवंडीतील अंजुर फाटा चिंचोटी महामार्गावर असलेल्या मालोडी,खार्डी, पाये,पायगाव परिसरात नवीन ठाणे बसणार असून या ठिकाणी स्वस्तात घरे मिळणार असल्याचे आमिष महावीर पटवा या बांधकाम व्यावसायिकांनी नागरिकांना २०१२ मध्ये दाखविले होते.विविध ठिकाणी याबाबतच्या जाहिराती महावीर पटवा यांनी केल्या होत्या. या जाहिरातींना भुलून सुमारे ४ हजारहुन अधिक नागरिकांनी या बांधकाम प्रकल्पात पैशांची गुंतवणूक केली होती मात्र महावीर पटवा बांधकाम प्रकल्पाचे व्यवसायिक राजेश पटवा यांनी गृह प्रकल्प अर्धवट सोडून गुंतवणूक दारांचे सुमारे १७५ कोटी रुपये हडप केले.
याबाबत महावीर पटवा बांधकाम व्यावसायिका विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक देखील करण्यात आली होती.यानंतर गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे व राज्य शासनाकडे देखील तक्रार दाखल केली होती.यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने १० नोव्हेंबर २०२३ रोजी महावीर पटवा बांधकाम व्यवसायिकाची मालमत्ता सील करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकल्पात गुंतवणूक करणारे अनेक गुंतवणूकदार गरीब असल्याने अनेकांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी या प्रकल्पासाठी दिली आहे तर अनेकांना घर मिळाले नाही मात्र संपूर्ण हफ्ते भरले आहेत त्यामुळे गुंतवणूकदार मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे २०१२ पासून आम्ही भरलेल्या रकमेवर बँकेने व्याज वसूल केला असल्याने आमचे पैसे आम्हाला व्याजासह परत मिळावे अशी मागणी या गुंतवणूकदारांनी केली आहे.संदर्भातील लेखी निवेदन देखील गुंतवणूकदारांनी भिवंडी प्रांताधिकारी कार्यालयात दिले आहे. तब्बल दहा वर्षांनंतर ही आयुष्यभराची पुंजी बांधकाम व्यावसायिकाला देऊनही या गुंतवणूकदारांना नागर मिळाले ना हक्काचे पैसे त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर पैसे व्याजासह परत मिळावे अशी मागणी या गुंतवणूकदारांनी शासनाकडे केली आहे.
भिवंडी महावीर पटवा प्रकल्पातील गुंतवणूकदारांच्या प्रतिक्रिया-
२०१३-१४ साली मी या प्रकल्पात तीन रूमचे घर घेतले होते ज्याचा ताबा २०१६ साली बांधकाम व्यवसायिक देणार होता यासाठी नऊ लाख रुपये रोखीने भरले होते मात्र अजूनही आम्हाला ना घर मिळाले ना आमचा पैसा अशी प्रतिक्रिया गुंतवणूकदार नितीन मोहिते यांनी दिली आहे.
२०१४ साली आम्ही दोन रूमचे घर या प्रकल्पात घेतले होते त्यासाठी दहा लाख रुपये भरले आहेत. या घराचा ताबा बांधकाम व्यवसायिक आम्हाला २०१९ रोजी देणार होता मात्र आजपर्यंत आम्हाला काहीच मिळाले नाही अशी प्रतिक्रिया ठाणे येथील रहिवासी व गुंतवणूकदार राजेंद्र पराडकर यांनी दिली आहे.
मी इन्शुरन्स कंपनीत कामाला असून २०१२ मध्ये या प्रकल्पात वन बीएचके घर घेतले होते, ज्याचा ताबा २०१४ साली मिळणार होता. यासाठी ५ लाख ८० हजार रुपये भरले असून आमच्या घराचे रजिस्ट्रेशन देखील झाले आहे. मात्र अजूनही आम्हाला घर मिळालेले नाही अशी प्रतिक्रिया जितेंद्र बिडकर यांनी दिली आहे.