ठाणे : पोलिस भरतीसाठी इंजेक्शनद्वारे उत्तेजक द्रव्य घेऊन धावण्याच्या चाचणीमध्ये भाग घेणाऱ्या औरंगाबादच्या एका २२ वर्षीय तरुणाला गुरुवारी बाद केल्याची माहिती पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली. त्याची वैैद्यकीय तपासणीही केली असून अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे शहर आयुक्तालयाच्या ५२१ जागांसाठी सध्या साकेत येथील पोलिस कवायत मैैदानावर उमेदवारांची शारिरिक आणि मैैदानी चाचणी घेतली जात आहे. १२ जानेवारी रोजी दुपारी औरंगाबादच्या या उमेदवाराची कागदपत्रे पडताळणीनंतर छाती आणि उंची तपासण्यात आली. यात पात्र ठरल्यानंतर गोळा फेक आणि १०० मीटर धावण्याच्या चाचणीमध्येही त्याने भाग घेतला. त्यानंतर त्याच्यासह अन्य उमेदवारांना एका व्हॅनमधून १६०० मीटर धावण्याच्या चाचणीसाठी नेले जात असतांना दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास त्याने इंजेक्शनद्वारे एक उत्तेजक द्रव्य घेतल्याचे आढळले. ते घेतल्याची माहिती भरतीसाठी त्याच्याबरोबर असलेल्या अन्य उमेदवारांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. त्याच्याकडून हे इंजेक्शन जप्त केले असून त्याची तातडीने वैैद्यकीय चाचणी केल्याची माहिती राबोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस संतोष घाटेकर यांनी दिली. त्याच्याकडे या इंजेक्शनबाबत चौकशी करण्यात येत असून रासायनिक विश्लेषकांच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. यापूर्वी, नांदेडमध्ये आॅक्सी बूस्ट हे इंजेक्शन घेतांना उमेदवाराला पकडण्यात आले. तर रायगडमध्येही असेच उत्तेजक द्रव्य एकाने घेतल्याचे आढळले. आता ठाण्यात तर अॅन्टी डोपिंग पथकाची निर्मिती होऊनही उमेदवाराने उत्तेजक द्रव्य घेतल्याचे आढळल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.‘‘औरंगाबादच्या उमेदवाराने उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन घेतल्याचे आढळले. रासायनिक विश्लेषकांच्या अहवालानंतर यावर पुढील कार्यवाही केली जाईल. तूर्त त्याला भरती प्रक्रीयेतून बाद केले आहे.’’गणेश गावडे, पोलिस उपायुक्त, ठाणे शहर