उल्हासनगर : अंबरनाथ मतदारसंघातून उद्धवसेनेचे उमेदवार राजेश वानखडे यांच्या शेजारी राहणाऱ्या राजेश वानखडे नावाच्या नागरिकांने अपक्ष उमेदवारी भरून वानखडे यांचे टेन्शन वाढविले आहे. वानखडे व किणीकर हे मतदारसंघातील प्रमुख प्रतिस्पर्धी असून अपक्ष उमेदवार राजेश वानखडे यांच्या उमेदवारीने नागरिकही संभ्रमित होण्याची शक्यता आहे.
अंबरनाथ मतदारसंघात उल्हासनगर पूर्वेतील बहुतांश परिसर येत असून उद्धवसेनेचे उमेदवार राजेश वानखडे हे शहर पूर्वेत राहणारे आहे. त्याच परिसरातील राजेश वानखडे नावाच्या नागरिकांने अंबरनाथ मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. उद्धवसेनेचे राजेश वानखडे व अपक्ष उमेदवार राजेश वानखडे हे शेजारी राहणारे असून मतदानाच्या दिवशीं स्थानिक नागरिकांसह मतदारसंघातील नागरिकांत एकसमान नावामुळे संभ्रम व गोंधळ उडण्याची शक्यता आहे. याबाबत उद्धवसेनेचे उमेदवार राजेश वानखडे यांना विचारले असता, निवडणूक लढविण्याचा सर्वांना अधिकार आहे. नावाच्या साधारम्यामुळे मतदानावर काही प्रमाणात परिणाम होणार असल्याची कबुली वानखडे यांनी दिली.
महायुतीकडून शिंदेसेनेचे बालाजी किणीकर तर महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे राजेश वानखडे हे प्रमुख प्रतिस्पर्धी असल्याने, दोघांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले. मात्र एकाच नावाचे दोन उमेदवार असल्याने, उद्धवसेनेचे उमेदवार राजेश वानखडे यांच्या टेन्शन वाढ झाली. अपक्ष उमेदवार राजेश वानखडे यांचा उमेदवारी अर्जा मागे अन्य कोणाचा हात. आहे का? याबाबतही मतदारसंघात चर्चेला ऊत आला आहे.