संदीप प्रधान
ठाणे : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी भविष्यात होणाऱ्या ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघातील विधानसभा व महापालिका निवडणुकीत भाजप, शिंदेसेना व अजित पवार गटाचे प्रत्येक मतदारसंघात किमान अर्धा डझन इच्छुक असताना मनसेची डाळ कशी शिजणार, याची चिंता कार्यकर्त्यांना वाटत आहे. मराठी बहुल शहरांत २००९ च्या निवडणुकीत मनसेला. लाखा लाखांची मते देणारा मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वाची कास धरण्यामुळे मनसेच्या मतांना ओहोटी लागल्याचीही येथील मनसैनिकांची भावना आहे
मनसे स्थापन झाल्यानंतर २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार राजन राजे यांना एक लाख ३४ हजार ८४० मते मिळाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत देशात मोदी लाट असल्याने मनसेची मते घटली व ठाण्यात अभिजित पानसे यांना ४८ हजार ८६३ मते मिळाली. कल्याण लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये मनसेच्या वैशाली दरेकर यांना एक लाख दोन हजार मते मिळाली होती. २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही मनसेच्या राजू पाटील यांना कल्याण मतदारसंघात एक लाख २२ हजार मते मिळाली होती. मोदींच्या उदयानंतर मनसेनेही हिंदुत्वाची भूमिका घेतली. परंतु मोदींसारखा हिंदुत्ववादी नेता समोर असताना मनसेचा हिंदुत्वाचा मुद्दा फिका पडला. त्यापेक्षा ठाणे, कल्याण भागात मराठीच्या मुद्द्याचा आग्रह ठेवला असता तर अधिक फायदा झाला असता, असे मनसैनिकांना वाटते.
२०१९ व आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देता मोदी विरुद्ध किंवा मोदींच्या पाठिंब्याकरिता केवळ प्रचार करण्यामुळे पक्षाची हानी होणार असल्याची मनसैनिकांची भावना आहे. तब्बल दहा वर्षे लोकसभा निवडणूक न लढण्यामुळे मनसे परीक्षा न देता त्याच वर्गात बसल्यासारखी स्थिती असल्याचे मनसैनिकांचे मत आहे.