उल्हासनगर : एका प्लास्टिक कारखानदाराला कारवाईची भीती दाखवून ४० हजार उखळणाऱ्या ४ तथाकथित पत्रकारांविरोधातउल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शहरात तथाकथित पत्रकाराची संख्या मोठी असून व्यापारी, बांधकाम व्यावसायिक हैराण आहेत. उल्हासनगर कॅम्प नं-२ खेमानी परिसरात जोसेफ जॉन डिसुझा यांचा मामल पॉलिमर्स एलएलपी नावाचा कारखाना आहे. १४ ते २१ नोव्हेंबेर २०२२ दरम्यान पत्रकार शिवकुमार मिश्रा, राजेश शर्मा, रेखा दिघे व नितेश खटवानी यांनी प्लॅस्टिकवर बंदी असतांना प्लॅस्टिकचे उत्पादन कसे करता. असा प्रश्न कारखानदार जोसेफ जॉन डिसुझा व त्यांचे मॅनेजर उदय खिल्लारी यांना केला.
तसेच पोलीस व प्रदूषण मंडळाला तक्रार करण्याची भीती दाखवली. या चौघांनी संगनमत करून त्यांच्याकडून ४० हजार रुपये उखळले. गौतम परिहार यांच्या तक्रारीवरून चौघावर गुन्हा दाखल झाला. दरम्यान तथाकथित पत्रकारांना कंटाळून प्लॅस्टिक व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन कारवाई करण्याचे निवेदन दिले होते.
शहरात तथाकथित पत्रकाराची संख्या मोठी असून त्यांच्या अवैध कारवाईला आळा घालण्याची मागणी राजकीय नेत्यांसह व्यापारी संघटना व पत्रकार संघाकडून वारंवार पोलीस उपायुक्तकडे झाली. यातील काही तथाकथित पत्रकार हे विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांचे काम करून स्वतःचा शहरात जरब बनवीत आहेत. अश्या तथाकथित पत्रकारां समवेत त्यांना आशीर्वाद दिलेल्या नेत्यावरही कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.