उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं- ५ परिसरातील जय जनता कॉलनीतील जुगार अड्ड्यावर मंगळवारी दुपारी धडक देऊन तोडफोड केल्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांसह शहरप्रमुख कैलास तेजी यांच्यावर हिललाईन पोलिसांनी गुन्हा दाखल झाला. बंद जुगार अड्ड्यावर विनापरवाना प्रवेश करीत तोडफोड करून नुकसान करीत स्टंटबाजीं केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
उल्हासनगरात अवैध धंद्याचे पेव फुटले असून शेकडो कुटुंबाजी फसगत होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख कैलास तेजी यांच्यासह असंख्य महिला कार्यकर्त्यांनी केला. तसेच मंगळवारी दुपारी ४ वाजता कॅम्प नं-५ येथील जयजनता कॉलनी व कैलास कॉलनी येथील जुगार अड्ड्यावर त्यांनी धडक दिली. यावेळी संतप्त महिला कार्यकर्त्यांनी जयजनता कॉलनी मधील जुगार अड्ड्याची तोडफोड करून कारवाईची मागणी केली. गेल्या महिन्यात आमदार कुमार आयलानी यांनी शहरातील अवैध धंदे, जुगार, ऑनलाईन लॉटरी, गावठी दारूचे अड्डे याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी केली. मात्र अवैध धंदे जैसे थे सुरू असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख कैलास तेजी यांनी केला. शिवसेनेच्या याप्रकाराने पोलीस कारभारावर टीका झाली.
हिललाईन पोलिसांनी महिलांनी ज्या जुगार अड्ड्यावर धडक देऊन तोडफोड करीत नुकसान केले. त्या जुगार अड्ड्यावर यापूर्वीच कारवाई होऊन ते बंद असल्याची माहिती प्रसिद्धपत्रकाद्वार हिललाईन पोलिसांनी दिली. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी स्टंटबाजी व प्रसिद्धीसाठी तोडफोड केल्याची प्रतिक्रिया हिललाईन पोलिसांनी दिली. शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख कैलास तेजी, उपशहरप्रमुख मधुकर साबळे, महिला शहर संघटक जया तेजी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यां विरोधात बंद जुगार अड्ड्यावर प्रवेश करून तोडफोड करून नुकसान केल्या प्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. अवैध धंद्यावर कारवाई न करता त्या विरोधात आवाज उठविणाऱ्यावर गुन्हे दाखल होत असल्याची प्रतिक्रिया शहरप्रमुख कैलास तेजी यांनी दिली.