भिवंडी : तालुक्यातील ओवळी येथील गोदामसंकुलात कापसाच्या कारखान्यात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या मायलेकाच्या मृत्यूस जबाबदार धरीत कारखाना मालका विरोधात गुरुवारी नारपोली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७ नोव्हेंबर रोजी दापोडा रस्त्यावरील ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कॉम्पलेक्स येथील शेजर इंटरप्रायजेस या सिंथेटिक कापसा पासून उशा बनविणाऱ्या कारखान्यात आग लागली होती. या आगीत कारखान्यात काम करणारी मजूर महिला शकुंतला रवि राजभर व तिचा तीन वर्षाचा चिमुरडा मुलगा प्रिन्स यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मृत महिलेचा पती रवी राजभर याने उशिरा ३० नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारी वरून नारपोली पोलिसांनी शेजर इंटरप्रायजेस या कारखान्याचे चालक संतोष चाफेकर यांनी आपल्या कारखान्यात मानवी सुरक्षेकरीता कोणतीही अग्निसुरक्षा साहित्यांची उपाययोजना केली नव्हती. त्यामुळे या अपघातास कारखाना चालकाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे निष्पन्न झाल्याने नारपोली पोलिसांनी कारखाना चालक संतोष चाफेकर या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.