उल्हासनगर : शहरातील सोनार गल्ली येथील महापालिका शौचालयावर अवैध बांधकाम करणाऱ्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. यापुढे महापालिका मालमत्तावर अतिक्रमण केल्यास सक्त कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अजीज शेख यांनी अतिक्रमण प्रमुख गणेश शिंपी यांना दिले.
उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती क्रं-२ येथील सोनार गल्लीतील पालिका शौचालयाच्या जागेवर अवैध बांधकाम झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, त्याची दखल आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, अतिक्रमण प्रमुख गणेश शिंपी यांनी घेऊन, बांधकामावर त्वरित पाडकाम कारवाई केली. सदर अवैध बांधकाम साप्ताहिक सुट्टीच्या दरम्यान उभे राहिल्याचे उघड झाले. त्यानंतर बांधकाम करणाऱ्याची चौकशी महापालिकेने सुरू केली. महापालिका कर्मचाऱ्यांच्या पाहणीत आहुजा नावाच्या इसमाने बेकायदेशिर बांधकाम केल्याचे निर्दनास आले.
अखेर महापालिका आयुक्त अजिज शेख यांच्या आदेशानुसार आहुजा या इसमावर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील कलम ५२, ५३, ५४ महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ३९७ (अ) अन्वये अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांचे आदेशानुसार गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी प्रभाग अधिकारी जेठानंद करमचंदानी यांना महापालिका मालमत्तेवर अवैध बांधकाम केल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले.
महापालिकेच्या तक्रारीनुसार उल्हासनगर पोलिसांनी टिल्लू आहुजा यांच्यावर महापालिका मालमत्तेवर अवैध बांधकाम केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. आयुक्त अजीज शेख यांच्या भूमिकेने अवैध बांधकाम करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून अशीच सक्त कारवाई करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना दिले. यापूर्वी महापालिका शाळेच्या मैदानावर सनद आल्याचा प्रकार आयुक्तांना माहीत होताच, मैदानावरील सनद त्वरित रद्द करण्याचे पत्र प्रांत अधिकाऱ्यांना दिले होते. महापालिकेच्या एकाही मालमत्तेवर अवैध बांधकाम अथवा अतिक्रमण खपवून घेणार नाही. त्याविरोधात सक्त कारवाईचे संकेत आयुक्त शेख यांनी दिले. आयुक्तांच्या भूमिकेने भूमाफियांचे मात्र धाबे दणाणले आहे.