- धीरज परब मीरारोड - मीरारोड येथील सिंगापुर इंटरनॅशनल स्कूल या शाळेचे संचालक निलेश कमलकिशोर हाडा व विशाल ओमप्रकाश पोद्दार यांनी लायन पेन्सिल्स कंपनीचे संचालक किरण पटेल यांची ४४५ कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरारोडच्या राष्ट्रीय महामार्गावरील ठाकूर मॉल मागे लायन पेन्सिल्स लि. या कंपनीचे संचालक किरण पटेल ( वय वर्षे ७१ ) यांच्या मालकीची जागा आहे. त्यांनी ८ एकर जागा ट्रेडवेल कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लि.चे निलेश व रितेश कमलकिशोर हाडा आणि विनोद फुलचंद मित्तल यांना ९९ वर्षाच्या कालावधीसाठी २००६ साली ३ कोटी अनामत रक्कम व रु. १२०० वार्षिक नाममात्र भाड्याने दिली. अनामत रक्कम पैकी १ कोटी २० लाख दिले मात्र बाकी रक्कम दिली नाही . सदर जागा ट्रेडवेल कंपनीने बँकेकडे गहाण ठेवून २० कोटी रुपयांचे कर्ज घेतले व त्या जागेवर सन २००७ मध्ये सिंगापुर इंटरनॅशनल स्कूल सुरू केले.
या शाळेमध्ये किरण पटेल व त्यांची कंपनी यांना ४० टक्के भागीदारी देण्याचे कबुल केले व त्यानुसार करार करण्यात आला. मात्र एक संचालक दिल्लीत असल्याने त्यांची सही घेऊन येतो सांगून त्या कराराची प्रत देखील दिली नाही. ट्रेडवेलचे संयुक्त खाते उघडण्यात आले मात्र धनादेश वर पटेल यांची स्वाक्षरी घेतली जात नसल्याने त्यांनी माहिती घेतली असता हाडा व मित्तल त्रिकुटाने दुसऱ्या बँकेत परस्पर खाते उघडून व्यवहार चालवल्याचे आढळले.
अनामत रकमेचे १ कोटी ८० लाख आणि २००७ पासूनचे भाडे रक्कम पटेल यांना न मिळाल्याने २०१४ साली त्यांनी करार रद्द करण्यात आल्याची नोटीस ट्रेडवेलच्या संचालकांना दिली . त्या नंतर लीज करार रद्द करण्याचा करार केला गेला . सदर वाद उच्च न्यायालयात गेल्या नंतर तेथे ट्रेडवेल आणि लायन पेन्सिल यांच्यात २०१५ साली समझोता झाला . ट्रेडवेल ने दर महिना ५१ लाख रुपये भाडे देण्याचे निश्चित झाल्याने लायन पेन्सिलची भागीदारी संपुष्टात आली .
मात्र २०१९ साली भाडे कमी करण्यास पटेल यांनी नकार दिल्या नंतर निलेश हाडा याने ट्रेडवेलच्या वतीने ठाणे न्यायालयात याचिका केली तसेच पोलिसां कडे तक्रार केली . कंपनीच्या मिनिट्सच्या नोंदी मध्ये हाडा याने बैठकांना ३ संचालक हजर असल्याची कागदे पोलिसांना दिली . मात्र कंपनी ऑफ रजिस्टार कडे दिलेल्या मिनिट्स मध्ये सर्व ५ संचालक बैठकांना हजर असल्याचे कळवले आहे . तसेच खोट्या नोंदी व मिनिट्स बनवले आहेत . एका बँकेतून ५ कोटींचे कर्ज घेण्यासाठी प्रस्ताव देऊन बँकेला खोटी माहिती देऊन निलेश हाडा याने फसवले आहे .
अश्या प्रकारे निलेश हाडा व विशाल ओमप्रकाश पोद्दार बनावटगिरी करून पटेल यांची ८ एकर जागा , चटईक्षेत्र मिळून ४४५ कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी २५ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे . वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत .