ठाणे - प्राणी, पक्ष्यांबद्दल सर्वांनाच संवेदना आणि प्रेमही असतं. त्यामुळे, घरातील पाळीव प्राण्यांना आपण कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतो. तर, निसर्गाच्या सानिध्यात वास्तव करणाऱ्या पशू, पक्ष्याचंही आकर्षण आपल्याला असतं. त्यामुळे, या वन्य जीवांसोबत काही क्षण व्यतीत करताना आपणास आनंद होतो. मात्र, प्रशासनाच्या चुकीमुळे जर वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असेल तर ही गंभीर बाब आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या याच कृत्याकडे लक्ष वेधले आहे. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे तलावातील अनेक मासे आणि दुर्मिळ कासव मृत्युमुखी पडल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय.
ठाणे महानगरपालिकेने सुशोभिकरणाच्या नावाखाली रायलादेवी तलावातील सगळं पाणी काढून टाकलं. कुठल्याही प्रकारचा शास्त्रीय सल्ला न घेता त्यांनी हे केल्यामुळे, पाणी काढल्यानंतर त्यामधील सगळे मासे मृत्युमुखी पडले. काही विशिष्ट जातीचे कासव, जे जगामध्ये काही भागांमध्येच शिल्लक राहीले आहेत. अशी कासवे सुद्धा मृत अवस्थेत आढळल्याचे सांगत आव्हाड यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटोही शेअर केले आहेत.