ठाणे: दिव्यातील चाळींवर कारवाई न करण्यासाठी तीन लाखांची मागणी करणाऱ्या तलाठी धोंडीबा खानसोळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी दिली. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराचे ठाणे तालुक्यातील सजा दिवा, मुंब्रा मंडळ भागात चाळींचे गेल्या काही दिवसांपासून बांधकाम सुरु आहे. याच चाळींच्या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी तलाठी खानसोळे यांनी तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीला सात लाखांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत त्यांनी ठाणे एसीबीकडे तक्रार केली होती. याच तक्रारीची २६ डिसेंबर २०२३ रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडे खानसोळे यांनी तीन लाखांच्या लाचेची मागणी केल्याचे उघड झाले. याप्रकरणी ८ एप्रिल २०२४ रोजी कळवा पोलिस ठाण्यात एसीबीचे पोलिस निरीक्षक नितीन थ्राेरात यांनी यांनी गुन्हा दाखल केला आहे.