ठाणे-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात आता ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात झालेल्या सभेवेळी राज ठाकरे यांनी तलवार दाखवली होती. यामुळे त्यांच्याविरोधात भारतीय दंडविधान कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे येथील एका कार्यक्रमात तलवार दाखवल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र गृह विभागाकडून देण्यात आली असल्याचं एएनआयनं म्हटलं होतं. त्यानंतर नौपाडा येथील पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्यासह ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज ठाकरे,मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्यासह ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ठाण्यात काल मनसेची 'उत्तर' सभा पार पडली. यावेळी ठाणे जिल्ह्याच्यावतीनं राज ठाकरे यांचा व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. यात त्यांना एक तलवार भेट देण्यात आली. राज ठाकरेंनी तलवार दाखवून तिचा स्वीकार केला होता. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, दाखवणे, उगारणे यासंदर्भात कायद्यात तरतुदी आहेत. अशाप्रकारचे गुन्हा याआधी महाविकास आघाडीतील मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्याविरोधातही दाखल झाले आहेत.