लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील उद्याच्या नामांकित गायकांच्या पाठीवर 'लोकमत'ने विश्वासाने हात ठेवला असून, साहित्य महोत्सवात सोमवार, २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत त्यांना कोरम मॉलमध्ये आपली कला सादर करण्याची संधी दिली आहे. ठाणेकरांच्या कानामनात सतत रुंजी घालणारी असंख्य गाणी ऐकण्याची व गुणगुणण्याची संधी लाभणार आहे. नक्षत्रांच्या गाण्याच्या या पखरणीपासून तुम्ही दूर राहू नका. या सूररसात अक्षरशः न्हाऊन निघा.
'लोकमत'च्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारांच्या मंगळवारी होणाऱ्या प्रमुख सोहळ्यापूर्वी तीन दिवसांचा साहित्य महोत्सव कोरम मॉलमध्ये आयोजित केला होता, पहिला दिवस अनेक अनुभवी व तरुण कवींच्या काव्यकचावरील प्रतिभेने साजरा झाला, रविवारी वर्दीतील दर्दी या कार्यक्रमात पोलिस, महापालिका, जिल्हा परिषद येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बहारदार गाणी सादर केली.
बासरी-तबला यांच्या सूर- तालावरील गीते सादर झाली सोमवारी या महोत्सवाची अखेर होणार असून, यावेळी उद्याच्या नामवंत गायकांना 'लोकमत'ने व्यासपीठ उपलब्ध करून दिले. रसिकांच्या ओठावर असलेली गीते गायक सादर करणार आहेत. रसिकांकरिता ही पर्वणी असेल.
हे गायक आज सादर करणार गाणीनंदन जोशी : ओमकार स्वरूपा, सुप्रिया पाटील प्रभो शिवाजी राजा, गौरव कांबळे: मल्हार वारी, वासुदेव फणसे : मन लागो रे, ज्योती जामकर : साधी भोळी मीरा तुला, शीतल बोपलकर : शारद सुंदर चंदेरी राती, हिमांशू मेहता : कधी तू रिमझिम करणारी बरसात, जयंत बेगडमल : हे चिंचेचे झाड मज, मनोज डांगे : प्रीतीच्या चांदराती, कमलेश माहीमकर: हिरवा निसर्ग हा भवतीने, भारती बच्छाव दिसे चार झाले मन, रसिका बेडेकर : वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे, चंद्रशेखर शिंदे : मी हाय कोली, महेक शेख : वेसावची पारू, साई घरत: लखलख चंदेरी तेजाची, लेखा तोरस्कर: माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं, शिल्पा चवरकर : सुन्या सुन्या मैफलीत माझ्या, श्रेया शिपी : माझ्या सारंगा, पूजा नाडकर्णी : केतकीच्या बनी तिथे, ऋजूल गोयथळे : येऊ कशी प्रिया, निहा नाईक : रुपेरी वाळूत माडाच्या बनात, सुरभी नाईक : चांदणे शिंपित जाशी, सावनकुमार सुपे : एक तू मित्र कर आरशासारखा.
रविवारची सुटी आणि पुस्तकांची खरेदी...!वडिलांसोबत खरेदी केली पुस्तकेविविध प्रकारची पुस्तके वाचण्याची आवड असणाऱ्या एका सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आपल्या वडिलांसोबत पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली. वडिलांनीदेखील मुलीच्या पुस्तक प्रेमापोटी कामातून अर्धा दिवस सुटी घेऊन मॉलमधील पुस्तक प्रदर्शनाला भेट देत मुलीला आवडणाऱ्या पुस्तकांची खरेदी केली.
ज्येष्ठांनीही जपली वाचनाची गोडीपुस्तक प्रदर्शनात रविवारी आबालवृद्धांची गर्दी पाहायला मिळाली. यामध्ये लहान मुलांसह ज्येष्ठांनी आपल्या वाचनाची गोडी जपली. अनेक ज्येष्ठ पुस्तकप्रेमी बराच काळ आपल्या आवडीची पुस्तके हाताळण्यात गुंग झाली होती.
पाककलेची पुस्तके पाहण्यात दंगपुस्तक प्रदर्शनात आलेल्या वाचकांनी विविध पुस्तके हाताळली. काहींनी आत्मचरित्र तर काहींनी आपल्या आवडत्या लेखकाची पुस्तके खरेदी करण्यावर भर दिला. रविवार सुटीची संधी साधत आपल्या पतीसोबत प्रदर्शनात आलेल्या काही महिला पाककला पुस्तक पाहण्याबरोबर त्या खरेदी करण्यावर भर दिला.