जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्याच्या नौपाडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार घनशाम गायकवाड यांचे १२ नाव्हेंबर २०२२ रोजी रात्रपाळी ड्युटीवर असताना पहाटेच्या सुमारास नितीन कंपनीजवळील उड्डाणपुलाजवळ अपघातात निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना एचडीएफसी बँकेने विम्याचे एक कोटी रुपये दिले आहेत. हा धनादेश पोलिस आयुक्त जयजित सिंग यांच्या हस्ते गुरुवारी त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.
गायकवाड यांना अपघात झाला त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाने त्यांच्या अधिपत्याखालील सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांची पगार खाती एचडीएफसी बँकेत ठेवण्याबाबत करार केला आहे. त्याअंतर्गत पोलिस दलातील कोणत्याही कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना एक कोटीचा विमा बँकेने देण्याचे यात म्हटले आहे. गायकवाड यांचे अपघातात निधन झाल्यामुळे अपघात विमा दावा एचडीएफसी बँकेला सादर केला होता. हा दावा बँकेने तातडीने मंजूर केला. या अपघात विम्यापोटी एक कोटींचा धनादेश दिवंगत घनश्याम यांची आई मंगल गायकवाड यांना १८ मे २०२३ रोजी पोलिस आयुक्त जयजित सिंग यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील, एचडीएफसीचे उपाध्यक्ष संदीप कोचर आणि सहायक उपाध्यक्ष एस. कुमार आदी उपस्थित हाेते.