कल्याण : ‘सर सलामत तो पगडी पचास’, अशी म्हण आहे. मात्र कल्याणातील एका अवलियाच्या अनोख्या छंदामुळे ती बदलून ‘सर सलामत तो पगडी तीन हजार’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. अनंत जोशी असे या अवलियाचे नाव असून, ते कल्याणमधील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे जगभरातील थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल तीन हजार युद्धकालीन शिरस्त्राण, टोप्या, पगड्यांचा संग्रह आहे.
जोशी हे मूळचे व्यावसायिक असून, आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत त्यांनी गेल्या ३५ वर्षांपासून हा अनोखा छंद जोपासला आहे. कल्याण स्टेशन परिसरातील त्यांच्या जुन्या घरात हा ठेवा जोपासला आहे. वयाच्या १७व्या वर्षी ते खूप आजारी होते. आजारपणात त्यांनी महाभारत व रामायण या मालिका बघितल्या. या मालिकांमध्ये घातलेले टोप त्यांना आकर्षित करीत होते. या टोपबद्दल माहिती मिळवताना त्यांची जिज्ञासा वाढत गेली. त्यातून त्यांना इतिहासकालीन विविध देशांतील टोप्या जमा करण्याचा छंद लागला. या संग्रहालयाचे त्यांनी शिरोभूषण असे नामकरण केले. भारतात सत्ता गाजवलेल्या मराठा, राजपूत, मुघल काळातील युद्धकालीन शिरस्त्राण, जिरेटोप आदींचा खजिना त्यांच्या शिरोभूषण संग्रहालयात जपून ठेवला आहे.
जगभरातील ब्रिटन, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया, चीन, रशिया आदी देशांतील विविध टोप्या, पगड्या, युद्धकालीन जिरेटोप, शिरस्त्राण जोशी यांच्या संग्रही आहेत. यातील सर्वात जुने म्हणजे १८व्या शतकात अफगाणिस्तानमध्ये धातूपासून बनवलेले शिरस्त्राणही आपल्या संग्रही असल्याचे जोशी यांनी सांगितले. वयाच्या १७व्या वर्षापासून भारतासह पाच ते सात देशात भटकंती करीत इतर देशातून त्या ठिकाणाहून टोपी आणली आहे. हजारो लोकांना भेटून ३५ वर्षे मेहनत घेऊन त्यांनी हा संग्रह केला आहे. २००५ मध्ये अतिवृष्टीत त्यांच्या खजिन्यातील सुमारे २०० टोप्या, पगडी, शिरस्त्राण पाण्यात भिजून खराब झाल्याने फेकून द्याव्या लागल्याची दुःखद आठवण त्यांनी यावेळी सांगितली. जोशी यांच्या या अनोख्या छंदाची दखल लिम्का बुक आणि इंडिया बुकने घेतली आहे. संपूर्ण जगभरात मानाचे स्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या गिनिज बुकनेही त्यांच्या कामाची दखल घेतली असल्याचे जोशी यांनी सांगितले.