मीरारोड - मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून शिवसेनेसोबत असल्याची ग्वाही देणारे मीरा भाईंदर शिवसेनेचे १९ पैकी ८ नगरसेवक आज गुरुवारी आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सामील झाले. आणखी काही नगरसेवक सुद्धा जाण्याची परंतु सध्या ७ ते ८ नगरसेवक शिवसेने सोबत दिसत आहे.
मीरा भाईंदर महापालिकेत सेनेचे २२ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी हरिश्चंद्र आमगावकर यांचे कोरोना काळात निधन झाले तर अनिता पाटील व दीप्ती भट यांनी भाजपाचा हात धरला. त्यामुळे सेनेचे १९ नगरसेवक आहेत. मीरा भाईंदर शिवसेनेची सर्व सूत्रे मातोश्रीवरून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आ . सरनाईक यांच्या हाती दिली होती.
२००९ साला पासून शिवसेनेचे आमदार व संपर्क प्रमुख असलेल्या आ . सरनाईक यांनी स्वतःची पकड निर्माण केली. त्यांनी अन्य पक्षातून देखील काही नगरसेवक आदींना सेनेत आणले. त्यामुळे एकनाथ शिंदें यांच्या बंडखोरीत सरनाईक देखील सामील झाल्याने शहरातील शिवसेनेत फूट पडणार हे स्पष्टच होते.
दरम्यान, पूर्वेश सरनाईक यांनी बोलावलेल्या बैठकीस सेनेचे मोजून ३ नगरसेवक तर सेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी बोलावलेल्या बैठकीस मोठ्या संख्येने नगरसेवक व शिवसैनिक सहभागी झाले होते . इतकेच नव्हे तर मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला बहुतांश नगरसेवक गेले होते. त्यावेळी भाजपाच्या एका स्थानिक नेत्या कडून कसा त्रास दिला गेला याचा पाढाच सरनाईकांसोबत गेलेल्या नगरसेवकांनी मातोश्रीवर वाचला होता.
परंतु आज गुरुवारी मुंबईच्या आलिशान हॉटेल लीला मध्ये राष्ट्रपती पदाच्या भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमात आ. सरनाईकांच्या नेतृत्वा खाली विरोधी पक्ष नेते धनेश पाटील सह राजू भोईर, कमलेश भोईर, संध्या पाटील, वंदना पाटील , हेलन जॉर्जी , एलायस बांड्या , अनंत शिर्के हे नगरसेवक , विक्रम प्रताप सिंह हे स्वीकृत सदस्य तर पदाधिकारी विकास पाटील , महेश शिंदे , राजू ठाकूर , हरिश्चंद्र म्हात्रे , राजेश वेतोस्कर, रामभावन शर्मा, निशा नार्वेकर, बाबासाहेब बंडे आदी शिंदे गटात सहभागी झाले . नगरसेविका कुसुम यांचे पती संतोष गुप्ता व दिवंगत नगरसेवक हरिश्चंद्र यांच्या पत्नी पूजा आमगावकर सुद्धा सरनाईकां सोबत होते .
विशेष म्हणजे राजू भोईर यांची उपजिल्हाप्रमुख पदी तर राजू ठाकूर व बंडे यांची नुकतीच शिवसेनेने उपशहर प्रमुख पदी नियुक्ती केली होती. माजी महापौर तथा नगरसेविका केटलीन परेरा यांनी आधीच शिंदे यांना शुभेच्छा देणारा फलक लावला होता. आज शिंदे गटात सहभागी झालेल्या पैकी नगरसेवक राजू यांच्या पत्नी भावना तसेच कुसुम गुप्ता नसल्या तरी त्या पतीच्या पावलावर जातील अशी शक्यता आहे. दरम्यान गटनेत्या नीलम ढवण सह प्रवीण पाटील , जयंती पाटील , तारा घरत , अर्चना कदम , दिनेश नलावडे, स्नेहा पांडे, शर्मिला बगाजी हे ८ नगरसेवक मात्र अजून शिवसेनेत आहेत असे चित्र आहे . तर शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी व शिवसैनिक सुद्धा मातोश्री सोबत असल्याचे दिसत आहे .