जितेंद्र आव्हाडांना कोण सांगणार?
ठाण्यात मागील काही दिवसांत उपवन फेस्टिव्हल, मालवणी महोत्सव, घोडबंदरला महाराष्ट्र महोत्सव झाले. या महोत्सवात राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून आली. महाराष्ट्र महोत्सवाला एकाच दिवशी खा. संजय राऊत आणि आ. जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली. याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. याच संधीचा फायदा घेत आव्हाड यांनी राजकीय भाषण सुरू केले आणि राज्यात शासनाकडून कसे काम सुरू आहे, याचा पाढा वाचला. कदाचित हे राजकीय व्यासपीठ नसून सांस्कृतिक व्यासपीठ आहे, याचा त्यांना विसर पडला. परंतु आव्हाडांना हे कोण सांगणार, अशी कुजबुज सुरू होती.
प्रथमच काँग्रेसचे अस्तित्व जाणवले
नवी मुंबई शहर हे तसे आधी शिवसेनेचा, नंतर राष्ट्रवादीचा आणि आता भाजपचा बालेकिल्ला. १९९५ पासून महापालिकेत काँग्रेसचे १२ ते १५ नगरसेवकच निवडून येत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पक्षाची ताकद क्षीण होत चालली आहे. अशातच गेल्या आठवड्यात अख्खे शहरभर मुख्य रस्ते आणि अंतर्गत भागात काँग्रेसचे झेंडे झळकताना दिसले. निमित्त होते, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या पुढाकाराने काढलेल्या क्रांती मोर्चाचे. प्रथमच काँग्रेसचे झेंडे जिकडेतिकडे दिसल्याने शहरात काँग्रेसचे अस्तित्व या झेंड्याच्या माध्यमातून का होईना २५-३० वर्षांत प्रथमच दिसल्याची कुजबुज ऐकायला मिळत आहे.