ठाणे : मुंबईतून इराणला जाणाऱ्या तुमच्या पार्सलमध्ये बॅन वस्तू असल्याची बतावणी करीत ठाण्यातील ४३ वर्षीय रश्मी शर्मा (४३) या महिलेला दहा लाखांचा गंडा घालणाऱ्या महेश चव्हाण (२४) याच्यासह चौघांच्या टोळक्याला अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी गुरुवारी दिली. या टोळीतील दोघांना राजस्थानच्या कोटा आणि पंजाबच्या चंडीगडमधून अटक केली आहे. आराेपींना चार मेपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
घाेडबंदर रोड भागातील शर्मा यांना २२ एप्रिल रोजी एका सायबर भामट्याने फोन करून इराणला पाठविण्यात येणाऱ्या तुमच्या कुरियरच्या पार्सलमधील वस्तू बॅन असल्याची बतावणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अंधेरी पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. काेणतेही पार्सल पाठवले नसून आपण ठाण्यात असल्याचेही शर्मा यांनी सांगितले. अंधेरीकडे यायला उशीर होईल, असेही त्यांनी सांगितले. त्यावर त्यांना ऑनलाइन सायबर तक्रार करा, असे सांगून स्काइप ॲप डाऊनलोड करून जी-मेल अकाउंट अन इन्स्टॉल करून स्क्रिन शेअरिंग करण्यास सांगितले. त्यानंतर (एमएच ०१८५) मुंबई एनसीबी डिईपीटी या आयडीवर मेसेज पाठविण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर आरोपीने त्यांना त्यांचे आयसीआयसीआय बँक खात्याचे ॲप ऑनलाइन ओपन करण्यास सांगून गेल्या सहा महिन्यांचे स्टेटमेंट पाहण्यास आणि तुमच्या खात्यात रक्कम पाठवितो, ती रक्कम आमच्या खात्यात परत करा, असेही सांगितले.
या भामट्याने शर्मा यांच्या खात्यात दहा लाखांचे वैयक्तिक कर्ज मंजूर करून ते पैसे दुसऱ्या खात्यावर त्यांच्याकडूनच ट्रान्सफर करून घेतले आणि नऊ लाख ८७ हजार २० रुपयांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कासारवडवली पोलिस ठाण्यात त्यांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रंजन सावंत आणि उपनिरीक्षक भागवत येवले यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे महेश चव्हाण (२४) आणि परमानंद बरले (२३) यांना अंबरनाथमधून काही तासांमध्ये अटक केली.
चौकशीत आंतरराज्य टोळीचा समावेश असल्याचे आढळले. त्यानंतर उपनिरीक्षक येवले आणि पोलिस नाईक प्रभू नाईक यांच्या पथकाने चंडीगड आणि कोटामधून दुर्गेश पांडे (२६) आणि अनस खान (२४) यांनाही ताब्यात घेतले. या चौघांनाही अवघ्या पाच दिवसांमध्ये अटक करून या गुन्ह्याची उकल केली. त्यांनी असे आणखी किती गुन्हे केले आहेत, याचाही शोध घेण्यात येत आहे.
फसव्या ॲपला टाळाअनोळखी क्रमांकावरून येणारे कॉल, मेसेज, सोशल मीडियावरील फ्रॉड ॲप टाळावेत. प्रायव्हेट लोन ॲप, मेसेजेसद्वारे येणाऱ्या अनोळखी लिंकपासून सावधानता बाळगा, असे आवाहन पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी केले आहे.