ठाणे : येऊरमधील बिल्डर सुधीर मेहता (५०) यांच्या फार्म हाऊसवर मंकी कॅप घातलेल्या सात जणांच्या सशस्त्र टोळक्याने शस्त्राच्या धाकावर दीड लाखांच्या रोकडसह १९ लाख ९० हजारांची लूट केली आहे. या टोळक्याने बिल्डर सुधीर यांच्यासह त्यांच्या मित्राला जिवे मारण्याची धमकी देत बांधून ठेवून ही लूट केली आहे. या घटनेने येऊर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
येऊर गावातील स्वानंदबाबा आश्रमाच्या पाठीमागे वानखेडे स्टेडियमजवळ असलेल्या आपल्या ‘पुष्पा फार्म हाऊस’वर सुधीर मेहता हे त्यांचे मित्र विनय नायर यांच्यासह झोपले होते. गुरूवारी पहाटे पावणेचारच्या दरम्यान सात दरोडेखोरांनी या फार्म हाऊसमध्ये शिरकाव केला. त्यांनी सुधीर यांच्यासह विनय नायर यांना गन, सुरा, लोखंडी रॉड आणि लोखंडी हूक आदी शस्त्रांचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत त्यांचे हात आणि पाय कापडी चिंध्यांनी बांधले. त्यानंतर घराच्या कपाटातील नऊ लाखांची १५ तोळयांची वेगवेगळया प्लॅटेनियम धातूची साखळी, दोन लाखांची सोनसाखळी, डायमंड पिन, मोबाइल आणि दीड लाखांची रक्कम असा १९ लाख ९० हजारांचा ऐवज दरोडा टाकून लुबाडला. या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात सात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दरोडोखोर १८ ते ३२ वयोगटातीलया दरोडेखोरांनी मंकी कॅप आणि हातात ग्लोव्हज घातलेले होते. हे सर्वजण १८ ते ३२ वयोगटातील होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनास्ळी ठाण्याचे सह पोलिस आयुक्त डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलिस आयुक्त विनायक देशमुख, उपायुक्त अमरसिंह जाधव, गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवराज पाटील आणि वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे आदींनी भेट देऊन पाहणी केली. वर्तकनगर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक या दरोडयाचा समांतर तपास करीत आहेत.