भिवंडी :शहरातील नविबस्ती नेहरूनगर या झोपडपट्टी परिसरात शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन मुलांमध्ये गुरुवारी सायंकाळी भांडण झाले होते.या भांडणा नंतर एका गटाने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.त्याचा राग मनात धरून दुसऱ्या गटाने रात्री त्यांच्या कुटुंबातील महिलांना तक्रार मागे घ्या अन्यथा तुम्हाला मारहाण करू अशी धमकी दिली होती.
शुक्रवारी दुपारी ते राहत असलेल्या परिसरामध्ये एका गटाकडून जोरदार हल्ला चढवत तुंबळ हाणामारीस सुरवात झाली. यामध्ये लाकडी दांडके व हाताने मारहाण केल्याने सहा जण जखमी झाले असून त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. या सर्व जखमींना भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात दाखल केल्या नंतर त्यापैकी चार जणांना पुढील उपचारासाठी ठाणे कळवा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर भिवंडी शहर पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी दिली आहे