ठाणे : हवेची गुणवत्ता कायम राखण्यासाठी मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि मार्गदर्शक तत्वे यांच्या अंमबजावणीसाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समित्यांनी भरारी पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी सकाळी सात वाजल्यापासून पाहणी आणि कारवाईस सुरूवात केली असून संध्याकाळपर्यंत ३६२ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण एक लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
यात, आनंद नगर चेक नाका येथे तैनात असलेल्या नौपाड्यातील पथकाने बांधकामाचा राडारोड्याची (रॅबीट) वाहतूक करणाऱ्या २१ डंपर्सवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर, माजिवडा प्रभाग समिती अंतर्गत एक आरएमसी प्लांट बंद करण्यात आला. शहरात सुरू असलेली बांधकामे, बायोमास जाळणे, राडोरोड्याची वाहतूक यांना नियमावलीचे पालन करण्यासाठी नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.