लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी: दि.१९-भिवंडी शहरातील अग्नी तांडव काही थांबण्याचे नाव घेत नसून दररोज कोठे ना कोठे आग लागण्याच्या घटना घडत आहेत.बुधवारी दुपारी नविबस्ती गोविंद कंपाउंड येथील प्लास्टिक मणी बनविणाऱ्या मोती कारखान्याला भीषण आग लागली असून या आगीमध्ये संपूर्ण मोती कारखाना जळून खाक झाला आहे.
या कारखान्यांमध्ये प्लास्टिक मणी बनविण्यासाठी कच्चा माल व केमिकल मोठ्या प्रमाणावर साठवलेले होते.त्या मधील थीनर ने पेट घेतल्याने आग झपाट्याने पसरत संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.या आगीच्या धुराचे लोट हवेत पसरल्याने संपूर्ण परिसर काळवंटून गेला होता.या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले .सुदैवाने कारखाना मागील दोन दिवसां पासून बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान मंगळवारी सायंकाळी महानगर पालिकेच्या पिली स्कुल येथील शाळेत ठेवलेल्या फिनेल व रद्दीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती.भिवंडीत दररोज आगीचे सत्र सुरूच असल्याने भविष्यात भोपाळ सारखी दुर्घटना होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे.