सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४, सुभाष टेकडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांनी पुढाकार घेऊन पुतळा स्मारक समितीच्या सदस्यासह समाजबांधवा सोबत चर्चा केली. किणीकर यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ सुभाष टेकडी येथील आंबेडकर चौकात डॉ आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा ३० वर्षांपूर्वी उभारला आहे. याजागी पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी महापालिकेत यापूर्वीच मंजुरी मिळाली असून काही तांत्रिक कारणामुळे पूर्णाकृती पुतळ्याचे काम थांबले आहे. पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी सर्वस्तरातून होऊ लागल्यावर स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांनी पुतळा स्मारक समितीच्या सदस्यां सोबत चर्चा करून रविवारी समाजबांधव व पुतळा स्मारक समिती पदाधिकाऱयांची बैठक घेऊन चर्चा केली.
आमदार किणीकर यांनी बोलविलेल्या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख रमेश चव्हाण, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, शांताराम निकम, प्रशांत धांडे, माजी अप्पर जिल्हाधिकारी एस एस ससाणे, नाना बागुल, पुतळा समितीचे अरुण काकळीज, सिद्धार्थ सावंत, आर एस गवई, रावसाहेब खरात, प्रवीण भगत आदीजन उपस्थित होते. पुढच्या रविवारी बैठकीनंतर काय प्रगती झाली. याबाबत चर्चा होऊन पुतळा उभारण्यासाठी शासनाकडून निधी आणणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार बालाजी किणीकर यांनी यावेळी दिले. चौकातील पूर्णाकृती पुतळा उभारण्या बरोबरच चौकाचे सुशोभीकरण, रुंदीकरण, रस्त्याची बांधणी आदी सूचनाही उपस्थितांनी दिल्या आहेत.