ठाणे: ठाण्यातील धर्मवीरनगर येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एका टोळक्याने शहबाज खान (१९, रा. धर्मवीरनगर, ठाणे) या अन्न पदार्थाचे वितरण करणाऱ्या तरुणावर तलवारीने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री ९:३० वाजता घडली. याच टोळक्याने या भागातील सात ते आठ वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हल्लेखोरांपैकी चंदन गुप्ता याच्यासह तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती चितळसर पोलिसांनी शनिवारी दिली.
शहबाज याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ३० जून रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास तो वास्तव्याला असलेल्या धर्मवीरनगरातील इमारत क्रमांक दोनच्या जवळ चंदन याच्यासह कुणाल वालवेकर, साहिल बच्ची, राहुल मोर्या, ध्रुव चव्हाण तसेच अन्य चार अशा आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तलवार, लाकडी बांबू आणि चाकू घेऊन घोळका केला. नंतर त्यांच्यापैकी राहुल मौर्या याने शहबाज याला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या दिशेने तलवार भिरकावली. परंतु, शहबाजने घरात पळ काढल्याने यात तो थाेडक्यात बचावला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे आणि वनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल शिरोळे आणि उपनिरीक्षक लहू राठोड यांच्या पथकाने चंदन याला अटक केली आहे.
फिल्मीस्टाईल आव्हानया टोळक्याने त्याला आव्हान देत ‘निचे आ आज तुझे जिंदा नहीं छोडेंगे’, असे आव्हान देत आरडाओरडा करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. शहबाज खाली येत नसल्याचे पाहून त्यांनी त्यांच्याकडील हत्यारांनी परिसरात उभ्या असलेल्या शहबाज याच्या चार ते पाच वाहनांसह अन्य काही वाहनांचीही तोडफोड करीत मोठ्या प्रमाणात नुकसान करून पळ काढला.