मीरारोड - काशीमीरा महामार्गावर गुजरातच्या एका व्यक्तीस लुटणाऱ्या रिक्षा चालकांच्या तीन जणांच्या टोळीला काशीमीरा पोलिसांनी अटक केली आहे.
गुजरातच्या अहमदाबाद मधील वृंदावन वाटिका मध्ये राहणारे जिग्नेश गोस्वामी ( ३५ ) हे काशीमीरा भागात थांबले होते . ९ डिसेम्बरच्या रात्री पावणे अकराच्या सुमारास ते प्रदीप उर्फ पन्नू दिलीप सवादकर ( २९ ) रा . हनुमान मंदिर जवळ , पेणकरपाडा , मीरारोड यांच्या रिक्षातून अजित पॅलेस ते सरोजा लॉज कडे जात होते .
रिक्षा चालक सवादकर ह्याने सरोजा लॉज कडे रिक्षा न नेता ती थेट काशीमीरा उड्डाणपूल वर नेली . त्याचवेळी अचानक फिल्मी स्टाईलने दुचाकी वरून आलेल्या जियाउल्ला उर्फ सोनू निजात खान ( २६ ) रा . के . एन . शेख कंपाऊंड , केतकी पाडा , दहिसर व अर्शद बासिद खान ( ३८ ) रा . गणेश मंदिर जवळ , मीरागाव , दोघांनी रिक्षाच्या समोर दुचाकी आडवी घालून रिक्षा अडवली .
रिक्षात बसलेल्या गोस्वामी यांना तुम्ही ड्रग्ज घेऊन जात आहात असे सांगून त्यांच्या कडील सोन्याची आंगठी , ब्रेसलेट , चैन असे १ लाख ५ हजारांचे दागिने बळजबरीने लुटून ते दुचाकीस्वार व रिक्षा चालक पसार झाले . त्या झटापटीत चैनच एक तुकडा रिक्षात पडला . १० डिसेम्बर रोजी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . जबरी लुटीच्या ह्या घटनेचे गांभीर्य पाहून उपायुक्त जयंत बजबळे यांनी लुटारूंना तातडीने पकडण्याचे निर्देश दिले होते .
पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश काळे, उपनिरीक्षक शिवाजी खाडे व पोलीस पथकाने या प्रकरणी तपास सुरु केला . पोलिसांनी या प्रकरणी १० डिसेम्बरच्या मध्यरात्री मीरारोड ह्या तिघा रिक्षा चालकांना अटक केली आहे . सोमवारी त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत . ह्या लुटारू रिक्षा चालकांच्या टोळीने गोस्वामी यांचे लुटले दागिने हस्तगत करण्यासह त्यांनी आणखी असे गुन्हे केल्याची शक्यता पोलीस तपासत आहेत .