नितीन पंडित
भिवंडी कल्याण मार्गावरील विजय सेल्स दुकानाच्या समोर असलेले सुमारे ७० ते ८० वर्षांपूर्वीचे पिंपळाचे महाकाय वृक्ष कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.दरम्यान झाड एका दुचाकीवर कोसळल्याने या दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले असून झाडाच्या लगत असलेली एका महिलेची चणे शेंगदाणे विकण्यासाठी उभी केलेली हातगाडीचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेनंतर भिवंडी कल्याण मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने सुरुवातीला झाड बाजूला करण्याचे प्रयत्न केले मात्र झाड आकाराने मोठे असल्याने जेसीबीच्या सहाय्याने बाजूला होत नसल्याने शेवटी महापालिकेच्या उद्यान विभाग व अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने या झाडाच्या फांद्या छाटून झाडाला बाजूला करण्यात आले. तर या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस यंत्रणेने अशोक नगर मार्गे वाहतूक वळविल्याने काही काळ वाहतूक कोंडीतून देखील नागरिकांची सुटका झाली. दरम्यान आपल्या हातगाडीचे झालेले नुकसान महापालिका प्रशासनाने मला भरून द्यावे अशी मागणी नुकसानग्रस्त वृद्ध महिलेने पालिका प्रशासनाकडे केली आहे.