ठाणे: जेवणाची ऑर्डर देण्यासाठी उशीर झाल्याच्या रागातून ओंकार भोसले (२७) याच्यासह तीन गुंडांनी हॉटेल मालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना आझाद नगर येथे बुधवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ष्घडली. या तिघांनीही हॉटेलमध्ये धुडगूस घालीत टेबलही उलटे करीत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी दिली.
आझाद नगर, ब्रम्हांड परिसरातील सागर गोल्डन हील टॉप या हॉटेलमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास आझादनगर परीसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार ओंकार याच्यासह अभि पाटील व त्यांचा एक राजू शर्मा असे तिघेजण दारू पिण्यास आणि जेवण करण्यासाठी आले होते. यावेळी हॉटेलच्या टेरेसवरील टेबलवर ते बसले. काही वेळानतर त्यांनी दारूसह जेवणाची दिली. त्यांच्या जेवणाची ऑर्डर दिल्यानंतरही ती मिळण्यास बराच वेळ लागल्याने त्यांनी जोरजोरात टेबल वाजवायला सुरुवात केली. अभि यानेच टेबल उलटा करीत मोठया प्रमाणात नुकसानही केले. वेटरला शिवीगाळही ते करू लागले. त्यावेळी हॉटेल चालक संतोष शेट्टी (४२, रा. घाेडबंदर रोड, ठाणे) यानी तिघांनाही हॉटेलच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर ते सर्वजण बाहेर निघुन गेले. मात्र, काही वेळातच ओंकार हा बाजुच्या चायनिज फुडच्या दुकानात गेला.
तिथून चाकू घेवून हॉटेलमध्ये त्याने शिरकाव करीत हवेत चाकू फिरवुन दहशत माजवू लागला. हॉटेलचे दुसरे भागीदार निलेश अण्णा यांनीही त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा ओंकारने त्यांच्या डाव्या हातावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. तर त्याच्या दोघा साथीदारांनी हॉटेलमध्ये तोडफोड करून नुकसान केले. या घटनेनंतर हल्लेखोर मोटार सायकलने तिथून पसार झाले. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी ओंकारसह अभि पाटील (२५) आणि राजू शर्मा (२६) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील ओंकार याच्याविरुद्ध हाणामारीसह गंभीर स्वरुपाचे २४ गुन्हे दाखल आहेत. हे टोळके ऑर्डरचे बिल देणार नसल्याची कल्पना हॉटेल मालकाला होती. त्यातूनच त्यांनी जेवणाची ऑर्डर देण्यास उशीर केल्याची शक्यता गृहीत धरुन या तिघांनी हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. चाकूने हल्ला केल्याचा हा संपूर्ण थरार हाॅटेलच्या सीसीटीव्हीमध्येही कैद झाला आहे. हे संपूर्ण थरारनाटय साेशल मिडीयावरही गुरुवारी माेठया प्रमाणात व्हायरल झाले हाेते.