अंबरनाथ : बिबट्याच्या बछड्याच्या डोक्यात पाण्याचा मोठा जार (बाटली) अडकल्याचा प्रकार बदलापूरजवळच्या गोरेगावमध्ये समोर आला आहे. या पिल्लाचा गेल्या 48 तासांपासून शोध घेतला जात होता. अखेर 48 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाला आणि प्राणी मित्रांना या बिबट्याचा शोध घेण्यात यश आले आहे सायंकाळी साडेसहा वाजता बिबट्या वन विभागाच्या हाती लागला असून त्याच्या माने मध्ये अडकलेल्या पाण्याचा जार काढण्यात आला आहे. तसेच तीन ते चार दिवसांपासून बिबट्या उपाशी असल्याने त्याची प्रकृती खालावली गेली होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये नेण्यात आले आहे.
बिबट्याचे हे पिल्लू साधारण एक वर्षाचे असून गोरेगाव परिसरात रविवारी रात्री ते पाणी पिण्यासाठी आले होते. मात्र यावेळी एका पाण्याच्या कॅनमध्ये त्याचे डोके अडकले. त्यामुळे ही कॅन घेऊन हे पिल्लू फिरत असतानाच एका पर्यटकाला दिसले. त्यामुळे त्याने त्याचा व्हिडीओ काढला. यानंतर या व्हिडिओच्या आधारे या पिल्लाचा रविवारी रात्रीपासून कसून शोध घेतला जातोय. वनविभागाचे अधिकारी कर्मचारी, एनजीओ, प्राणीमित्र संघटना असा मोठा फौजफाटा या बिबट्याच्या पिल्लाला शोधण्यासाठी मेहनत घेत होते. रविवारी रात्रीपासून या पिल्लाच्या डोक्यात कॅन अडकल्याने ते उपाशी आणि तहानलेले होते. त्यामुळे त्याला लवकरात लवकर शोधण्याचे आव्हान वनविभागासमोर होते.
सोमवारी आलेल्या अपयशानंतर मंगळवारी पहाटे पासूनच वन विभागाच्या चार टीम, प्राणी मित्रांचे पाच टीम आणि सामाजिक संस्थेचे काही कार्यकर्ते या बिबट्याच्या शोधात दिवसभर भटकंती करीत होते. वन विभागाच्या वतीने मुरबाड, टोकावडे, कल्याण, अंबरनाथ या भागातील बहुसंख्य कर्मचारी या बिबट्याच्या शोधात फिरत होते. अखेर मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता हा बिबट्या वन विभागाच्या ताब्यात आला.
लागलीस मानेत अडकलेला जार काढून वन विभागाच्या डॉक्टरांच्या पथकामार्फत त्या बिबट्या वर उपचार देखील सुरू करण्यात आले आहेत. बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर उपचार करावे की जंगलात सोडावे हे याबाबतचा निर्णय डॉक्टर घेणार आहेत. बिबट्या डॉक्टरांचा निगराणीत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे प्राणी मित्रांनी सांगितले.