ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मात्र, ज्या पद्धतीने केतकी चितळे हिने पोस्ट केली होती. त्याचप्रमाणे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील रिट्विट करत पोस्ट केलेली आहे. मग केतकी चितळेला एक न्याय आणि मंत्री महोदय यांना एक न्याय का ? असा सवाल केतकीचे वकील योगेश देशपांडे यांनी विचारला आहे. केतकीचे वकील वसंत बनसोडे यांनी दाखल केला जामीन अर्ज देखील दाखल केला आहे. केतकी चितळे हिच्यावर राज्यभर गुन्हे दाखल आहेत. त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सर्व गुन्हे रद्द करण्याची मागणी केतकीचे वकील योगेश देशपांडे ,यसस लीगल करणार असल्याचे सांगितले आहे.
राज्यात अनेकविध ठिकाणी तिच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, २०२० मधील एका प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयाने जामीन नाकारला तरीही तिला रबाळे पोलिसांनी अटक न केल्याचे प्रकरण उजेडात आणण्यात आले. यानंतर केतकी चितळेला रबाळे पोलिसांनी ताब्यात घेतले. ठाणे न्यायालयासमोर हजर केल्यानंतर सुरुवातीला केतकी चितळेला ५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती.
आता मात्र, तिला याच प्रकरणात १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच रबाळे पोलीस स्थानकात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याबाबत वकील वसंत बनसोडे यांनी जामीन अर्ज केलेला आहे. उद्यापर्यंत या जामिनावर युक्तिवाद होणार आहे. केतकी चितळे यांची कुठलीही पोलिसांबाबत तक्रार नाही. तिला ठाणे मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे.