ठाणे - ठाण्यातील वर्तकनगर परिसरात एका नवीन इमारतीचे काम सुरु असतांना एक कर्मचारी खाली कोसळला. या घटनेत या कामगाराच्या शरीरात लोखंडी सळ्या घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.
वर्तकनगर येथील थिराणी विद्यामंदिर शाळेजवळ, नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी काम करणारा एक अनोळखी कर्मचारी वरून खाली पडल्याने लोखंडी सळ्या त्याच्या शरीरात घुसल्या. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तसेच, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, एक- फायर वाहन आणि रुग्णवाहिकेसह दाखल झाले होते. रात्री उशिरा हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.