- नारायण शेट्टी
शहापूर : तालुक्यातील उंबरखांड या गावातील मधुकर लहू निमसे यांच्या राहत्या घरात सोमवारी रात्री उशीरा दीड-दोनच्या सुमारास एक बिबटा शिरल्याने कुटुंबियांचे तोंडचे पाणी पळाले. खर्डीपासून जवळ असलेल्या उंबरखांड गावात 35 ते 40 कुटुंब राहत असून एकूण लोकसंख्या 250 च्या आसपास आहे.
पती-पत्नी व दोन मुलगे असे निमसे कुटुंबीय रात्री गाढ झोपेत असताना घराच्या मागील बाजूस असलेल्या बेड्यातून कसला तरी आवाज आला म्हणून पती-पत्नी बाहेर येऊन बघायला लागले. बाहेर अंधार होता, त्या अंधारात त्यांना काहीतरी आत शिरल्याचा संशय आला. पत्नीने लगेज आपल्या मुलांना जागे करून मुख्य दरवाजातून ते बाहेर पडले.
घराचे दोन्ही दरवाजे बंद करून त्यांनी आजूबाजूच्या रहिवाश्यांना उठवून घरात काहीतरी शिरल्याचे सांगितले. रहिवाश्यानी बॅटरीच्या साहयाने घरात डोकावून आत काय शिरले त्याचा शोध घेत होते. तितक्यात आत अडकलेल्या बिबट्याने झडप मारली सुदैवाने पक्के घर असल्याने व खिडकीला लोखंडी ग्रील असल्याने बिबट्याच्या हल्ल्यापासून बचावले.
घरात बिबटा शिरल्याचे समजताच उंबरखांडचे पोलिस पाटील रवींद्र निमसे यांनी वनविभाग आणि पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. काही वेळात पोलिस आणि वन विभागाचे अधिकारी येऊन गावावर पहारा ठेवला आहे. बोरिवली येथून रेस्क्यू टीम ला बोलावून बिबट्याला ताब्यात घेण्यात येईल.आजूबाजूचा परिसर जंगल परिसर असून भक्ष्य शोधत या गावापर्यत आला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.