अंबरनाथ : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे भाजप-शिवसेना युतीचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा जल्लोष सुरू असताना गर्दीचा फायदा घेऊन पाकिटमाराने चक्क विजयी उमेदवाराचेच पाकीट मारले. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पोलिसांकडे याबाबत तोंडी तक्रार केली आहे.
गुरुवारी नेरूळ येथील मतमोजणी केंद्रावर म्हात्रे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जात होता. या जल्लोषात शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्याने गर्दीचा फायदा घेत पाकिटमाराने अनेक कार्यकर्ते-पदाधिकारी यांची पाकिटे लंपास केली. काहींचे मोबाइल चोरट्याने लंपास केले. या चोरट्याची भूक येथेच भागली नाही. त्याने थेट विजयी उमेदवाराच्या खिशातच हात घातला. म्हात्रे यांच्या पुढच्या खिशातील ५० हजार रुपये आणि मागच्या पर्समधील २५ हजार रुपये अशा एकूण ७५ हजारांवर चोरट्याने डल्ला मारला. आपले पाकीट मारले गेल्याचे म्हात्रे यांच्या लक्षात येताच त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. विजयाच्या जल्लोषात पाकीटमार सहभागी झाल्याने एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
या आधीदेखील केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मंत्रिपदाच्या जल्लोषा दरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांचे आणि पत्रकारांचे मोबाइल आणि पाकिटे लंपास केली गेली होती. रॅली, जल्लोष आणि जाहीर सभेदरम्यान पाकीट मारायच्या ज्या घटना घडल्या आहेत याबाबतच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. मात्र या चोरट्यांचा अद्यापही शोध घेण्यात आलेला नाही. असाच काहीसा प्रकार गेल्या महिन्यात मुरबाडच्या म्हसा यात्रेत घडला असून अनेकांचे पाकीट मारण्याचे काम चोरट्यांनी केले होते.