भिवंडी : काका-पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना भिवंडी तालुक्यात घडली असून काकासह चुलत भावाने अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासात पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
उत्तर प्रदेश येथील मूळ निवासी असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन पीडितेला दीड महिन्यापूर्वी तिच्या काकांनी आपली मोठी सून बाळंत होणार असल्याने घरकामासाठी भिवंडीतील आपल्या घरी आणले. या काळात ५२ वर्षीय काकासह २२ वर्षीय चुलत भाऊ या दोघांची वासनांध नजर या अल्पवयीन पीडितेवर पडली. त्यांनी वेगवेगळ्या दिवशी पीडितेवर बलात्कार केला. या अत्याचाराने भयभीत झालेल्या पीडितेने आपल्यावर बेतलेली करुण कहाणी याच परिसरात वास्तव्यास असलेल्या आपल्या मावशीला सांगितली. मावशीने तातडीने पीडितेस घेऊन थेट आयजीएम शासकीय रुग्णालय गाठले. त्या ठिकाणी केलेल्या वैद्यकीय तपासणीत अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती स्थानिक भिवंडी तालुका पोलिसांना कळविली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, महिला पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. रत्ने व पो हवालदार केदार, भामरे, गोखले, भोईर या पथकाने पीडित मुलीचा जबाब नोंदवून तत्काळ काका व चुलत भाऊ यांच्या विरोधात बलात्कारासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची कुणकूण लागताच ते दोघे उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच भिवंडी तालुका पोलीस पथकाने शिताफीने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींना सोमवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.