मीरारोड - अवघ्या दीड वर्षाच्या बाळाचा ताबा आई कडे देण्याच्या न्यायालयाच्या आदेशा नंतर देखील त्यासाठी धडपडत असलेल्या महिलेचा तिचा माथेफिरू पतीनेच भर दुपारी भर रस्त्यात गळा चिरून खून केल्याची घटना शुक्रवारी मीरारोड येथे घडली आहे . पत्नीची हत्या केल्या नंतर माथेफिरू पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
मीरारोडच्या नया नगर मधील अस्मिता रिजन्सी मध्ये राहणाऱ्या नदीम अझीझ खान ( वय ३९ वर्षे ) ह्याची पत्नी आमरीन खान ( वय ३६ वर्षे ) हि कौटुंबिक वादा मुळे गेल्या दिड - दोन वर्षां पासून वांद्रे येथे माहेरी रहात होती . परंतु नदीम ह्याने दिड वर्षाच्या बाळासह १२ वर्षाच्या मुलीचा ताबा स्वतः कडे ठेवला होता . आमरीन हि मुलांना घेण्यासाठी यायची तेव्हा तिला मुलांना भेटू न देणे आणि तिच्या सोबत भांडण करणे असे प्रकार सुरु होते . नया पोलीस ठाण्यात देखील तक्रारी झाल्या होत्या.
मुलांसाठी व्याकुळ असलेल्या आमरीन हिने २०२३ साली मुलांचा ताबा मिळावा म्हणून ठाणे न्यायालयात दाद मागितली होती . १४ ऑगस्ट २०२४ रोजी ठाणे न्यायालयाने दिड वर्षाच्या बाळाचा ताबा आई आमरीन कडे तर १२ वर्षाच्या मुलीचा ताबा वडील नदीम कडे ठेवण्याचे आदेश दिले . न्यायालयाच्या आदेशा नंतर देखील पती नदीम हा मुलाचा ताबा देत नसल्याने आमरीन नया नगर पोलीस ठाण्यात मुलाच्या ताब्या साठी जात होती.
गुरुवारी तिने पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्त साठीचे ७ हजार रुपये भरले असता दोन पोलीस कर्मचारी तिच्या सोबत दिले गेले होते . परंतु घरी मुलं नव्हती आणि नदीम ह्याने त्याची आई मुलांना घेऊन अजमेर येथे दर्शनासाठी गेल्याचे सांगितले . परंतु मुलं इकडेच असल्याचा आमरीन हिला संशय असल्याने शुक्रवारी ती पुन्हा नया नगर पोलीस ठाण्यात आली होती . परंतु पोलिसांनी तिला सहकार्य केले नाही . बराच वेळ बसून ती मुलगी शाळेत आहे कि नाही ? हे पाहण्यासाठी नया नगरच्या एन एच शाळेत जाण्यास निघाली . दुपारी पाऊणच्या सुमारास ती अस्मिता अनिता कॉम्प्लेक्स येथील मशिदी समोरून रस्त्यावरून चालली होती . त्याचवेळी नदीम आला आणि त्याने तिच्यावर चाकूने वार करत तिचा गळा चिरला . भर दुपारी वर्दळीच्या रस्त्यावर हे हत्याकांड घडल्याने एकच खळबळ माजली.
सीसीटीव्ही यंत्रणा लोकार्पणचा कार्यक्रम असल्याने मी पोलीस ठाण्यात होतो . त्यावेळी आमरीन हि बसलेली होती . आपण मुलाचा ताबा मिळवण्यासाठी अनेक दिवसां पासून पोलीस ठाण्यात फेऱ्या मारत असल्याचे आणि पोलीस बंदोबस्त शुल्क चे ७ हजार रुपये भरल्याचे तिने सांगितले . ती हतबल व रडण्याच्या अवस्थेत होती . आपण मदत करू असे तिला सांगितले . परंतु कार्यक्रम संपल्या नंतर ती दिसली नाही. तिची हत्या झाल्याचे समजले. गुन्हे असलेल्या , राजकारणी , बिल्डर आदींना लगेच पोलीस संरक्षण मिळते . परंतु एका आईला तिच्या तान्ह्या बाळाचा ताबा देण्यासाठी पोलीस किती असंवेदनशीलता व उदासीनता दाखवतात . तिच्या संरक्षण साठी किती दुर्लक्ष करतात याचा आमरीन हिची हत्या हे ज्वलंत उदाहरण आहे . - डॉ . सुरेश येवले ( ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते )
पोलिसांनी आमरीन हिला गुरुवारी मुलाचा ताबा घेण्यासाठी बंदोबस्त दिला होता . त्यामुळे अर्धवट हिताच्या आधारे कोणी काय आरोप करतात त्यात तथ्य नाही . शुक्रवारी आमरीन हिची हत्या करणाऱ्या नदीम ह्याला लोकांनी आणि जवळच बंदोबस्त साठी असलेल्या पोलिसांनी पकडले . नदीम ह्याच्यवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून खुना साठी वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे . - प्रकाश गायकवाड ( पोलीस उपायुक्त , मीरा भाईंदर )