संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक
ठाणे शहरासमोरील आरोग्य व वाहतूक कोंडी या समस्या दिवसागणिक जटिल होत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी अनेक प्रकल्प राबवले जात आहेत व प्रस्तावित आहेत. परंतु, ते पूर्णत्वाला जायला किमान दोन ते दहा वर्षे लागणार आहेत. या काळात ठाण्याची वाढणारी लोकसंख्या, वाहने आणि पर्यायाने दोन्ही आघाड्यांवर गडद होणारी आव्हाने यांचा विचार करता केलेल्या उपाययोजना तोकड्या ठरतील, असेच चित्र आहे.कोरोनामुळे ठाणेकरांना आपली आरोग्य व्यवस्था किती तोकडी आहे, याचा अंदाज आला. मुंबई परिसरात महापालिका व सरकारी रुग्णालये असल्याने मुंबईत कोरोनाचा सामना करणे काही अंशी शक्य झाले. ठाण्याचा विचार केला तर जिल्हा शासकीय रुग्णालय, महापालिकेचे कळवा येथील हॉस्पिटल, सुमारे ३० दवाखाने, सहा प्रसूती केंद्र व काही मोजके आपले दवाखाने अशी अत्यंत तोकडी व्यवस्था उपलब्ध आहे. ठाण्यात ही स्थिती आहे तर जिल्ह्यातील अन्य शहरांमधील आरोग्य व्यवस्थेबद्दल न बोललेच बरे. कोरोनानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी ९०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय झाला. हे काम वेगात सुरू आहे. ‘जितो’मार्फत कर्करोग रुग्णालय उभे राहत आहेत. त्यामुळे मुंबईतील टाटा रुग्णालयावरील ताण कमी होईल. महापालिकेचे कळवा रुग्णालय ५०० खाटांचे आहे. त्याची क्षमता वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्याकरिता सरकारने १५० कोटी रुपये निधी दिला आहे. परंतु, या रुग्णालयाची इमारत जुनी झाली आहे. त्यामुळे ते पाडून नव्याने बांधावे लागेल. साहजिकच सध्या शासकीय रुग्णालय पाडून नवे बांधले जात असताना महापालिकेचे रुग्णालय पाडता येणार नाही. त्यामुळे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे राहिल्यावर कळवा रुग्णालयाचे काम सुरू होईल. याखेरीज महावीर जैन हॉस्पिटल व किसन नगर येथील गंगूबाई शिंदे रुग्णालय अशा सुविधा उपलब्ध आहेत. महात्मा फुले योजनेत तेथे गोरगरिबांवर उपचार केले जातात. वाहतूक कोंडीचा ग्रह ठाणेकरांच्या कुंडलीतून जात नाही. ठाण्यात माणशी एक वाहन आहे. येथील टॉवरमध्ये एकेका कुटुंबाकडे दोन व त्यापेक्षा जास्त मोटारी आहेत. ठाणे जिल्ह्यातील एकाही शहरात मुंबईत जशी बेस्टची बससेवा आहे, तशी बससेवा नाही. जवळपास २५ ते ३० लाख लोकसंख्येकरिता ठाण्यात केवळ ३०० सार्वजनिक बसगाड्या आहेत. त्यामुळे रिक्षा, खासगी बसगाड्या यांच्या मनमानी कारभारावर लोकांना विसंबून राहावे लागते. गायमुख-भिवंडी तसेच वडाळा-कासारवडवली हे मेट्रो मार्ग सुरू झाले तर घोडबंदरची वाहतूक कोंडी काही अंशी नक्की सुटेल. परंतु, त्याला किमान तीन वर्षे लागतील. ज्ञानसाधना कॉलेजच्या मागे नवे ठाणे रेल्वेस्थानक उभे राहत आहे. ते उभे राहिले तर सध्याची गर्दी काही अंशी कमी होईल. नव्या स्थानकात उतरून प्रवासी मेट्रोने घोडबंदर व बोरीवलीच्या दिशेने जातील. ठाण्यातील रस्त्यांलगतचे सर्व्हिस रोड बंद करून दोन्ही बाजूला पाच-पाच लेनचे रस्ते उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणारा भूमिगत मार्ग सुरू झाला तर ठाण्याहून बोरीवलीकडे होणारी वाहतूक सुकर होईल. हा मार्ग २०२८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.