मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील मीरा भाईंदर महापालिकेच्या डम्पिंग ग्राऊंड मध्ये प्रक्रिया न केलेल्या कचऱ्याचा डोंगर लगतच्या स्थानिकांच्या जागेत कोसळला आहे. या आधी देखील कचऱ्याचा डोंगर कोसळून धावगी झोपडपट्टीतील काही घरे गाडली गेली होती. या घटनेबद्दल स्थानिकांनी संताप व्यक्त करून अधिकारी व ठेकेदारावर कारवाईची मागणी केली.
महापालिकेने धावगी येथील डोंगरावर शासना कडून फुकट मिळालेल्या जमिनीवर प्रक्रिया न करताच कचरा अनेक वर्षांपासून पडून टाकल्याने कचऱ्याचा डोंगर उभा राहिला आहे. कचऱ्याच्या डोंगराला आगी लागण्याच्या घटना सातत्याने घडत असून घातक धुराचे साम्राज्य व दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांना असह्य झाले आहे. लोकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.
कचऱ्यातील लिचेट हे अतीशय घातक पाणी खालील शेतात जाऊन शेती नापीक झाली आहे. येथील भूगर्भातील व विहरीतले पाणी दूषित झाले आहे. ते प्रदूषित पाणी पुढे खाडी मार्गे समुद्रात जाऊन जलप्रदूषण होत आहे. परंतु गेली अनेकवर्ष महापालिका मात्र केवळ कचऱ्याच्या डोंगरावर प्रक्रिया करू अशी खोटी आश्वासने देत असल्याचे आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आले आहेत. त्यातच कचऱ्याच्या डोंगराचा मोठा भाग पालिकेने बांधलेल्या कुंपण भिंती पलीकडील स्थानिकांच्या जमिनीत कोसळला आहे. कचऱ्याचा डोंगर कोसळल्याचे प्रकरण समोर येताच पालिकेने ठेकेदाराला मार्फत कचरा बाजूला करण्याचे काम सुरु केला आहे.
मच्छीमारनेते बर्नड डिमेलो यांनी सदर प्रकरणी महापालिकेस तक्रार केली आहे. मानवी जीवन व पर्यावरणावर घातक असे परिणाम ह्या कचरा प्रकल्पा मुळे झाले असून कायदे - नियमांचे उल्लंघन सातत्याने केले जात आहेत. शेतजमिनी नापीक झाल्या, हवा प्रदूषित झाली आहे. स्थानिकांना उध्वस्त करणारा हा भस्मासुर प्रकल्प हटवण्याची मागणी डिमेलो यांनी केली आहे. बेजबाबदार अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करा, शहरातील प्रभाग निहाय कचरा प्रकल्प सुरु करून धावगी येथील कचऱ्याच्या डोंगरावर प्रक्रिया करा अन्यथा जनआक्रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा डिमेलो यांनी दिला आहे.