ठाणे :
एलजीबीटीक्यूआयए (LGBTQIA+) या समुदायाच्या समस्यांकडे समाज तसेच देशाने माणूसकीने पहावे, त्यांनाही माणूस म्हणून सर्व मूलभूत हक्क प्राप्त व्हावे’, हे साध्य करण्यासाठी समाजाची आणि एकंदरीत देशाची मानसिकता कशी असावी यासंदर्भात राष्ट्रस्तरावर विचारमंथन व्हावे या हेतूने ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात २० सप्टेंबर, २०२२ रोजी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे.
एलजीबीटीक्यूआयए (LGBTQIA+) समुदायाला त्यांच्या ‘लैंगिक अल्पसंख्याक’ अशा ओळखीमुळे सततच्या भेदभावाला सामोरे जावे लागत आहे. या वस्तुस्थितीची आपणा सर्वांना जाणीव आहे, म्हणून ही परिषद लैंगिक समानतेचे समर्थन करणारी आणि लैंगिकवैविध्याकडे पाहण्याच्या शिक्षणक्षेत्रातील व समाजातील सर्व भागधारकांच्या नकारात्मक दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडवून आणू इच्छिणारी आहे. ही परिषद या समुदायाला भेडसावणाऱ्या भेदभावावर लक्ष केंद्रित करेल आणि विविधतेची समज वाढवेल. तसेच, लैंगिकवैविध्याचे स्वागत करण्यासाठी तरुणांमध्ये संवेदनशीलता निर्माण करेल. असामान्य लैंगिकवैविध्यामुळे समाजाने तिरस्कृत वागणूक दिलेल्यांसाठी स्वःप्रगती साधण्यास व त्यांना सक्षम बनविण्यात मदत करेल असा विश्वास महाविद्यालयाने व्यक्त केला आहे. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील ‘बिईंग मी’ समिती विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व समाज अशा सर्व भागधारकांमध्ये तृतीयपंथीयांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणूकीबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. २०२०-२१ पासून लैंगिकवैविध्याबाबत असलेली रूढीप्रिय नकारात्मक मानसिकता सकारात्मकतेत परावर्तित करण्यासाठी "बिईंग मी" हा ५ वर्षांचा प्रकल्प म्हणून घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या या परिषदेचा उपयोग राष्ट्रस्तरावर समानतेसाठी केला जाणार आहे. या परिषदेत एलजीबीटीक्यूआयए (LGBTQIA+) समुदायाच्या ऐतिहासिक संदर्भ, या समुदायाने अनुभवलेली आव्हाने, समाजाकडून असलेल्या अपेक्षा यांच्या अभ्यासावर भर दिला आहे. सर्व स्वयंसेवी संस्थानी सदर आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होऊन परिषदेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.
आंतरराष्ट्रीय परिषदेची उद्दिष्टे:-अ) एलजीबीटीक्यूआयए (LGBTQIA+) समुदायासमोरील आव्हाने आणि समाजाकडून त्यांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी पुढाकारआ) लैंगिक वैविध्याकडे बघण्याचा भागधारकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्नइ) लिंग ओळख आणि लिंगसमानता याबद्दल व्यापक दृष्टीकोनासाठी लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी शैक्षणिक संस्थेच्या योगदानावर चर्चा करणे.