- जितेंद्र कालेकर ठाणे - कॉलेजला जाणाऱ्या मुलीला कळवा कारशेडमध्ये सोडविण्यासाठी गेलेल्या गणपतसिंह हुकूमसिंह राजपूत (४९) यांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडली.
कळव्यातील मनिषानगर भागात राहणारे राजपूत एका सराफाच्या दुकानात कारागीर होते. ते १९ जानेवारी रोजी सकाळी भांडूप येथील कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीला सोडविण्यासाठी कळवा कारशेडकडे गेले होते. तिला सोडविल्यानंतर त्यांनी तिला बाय केले आणि तिथून परतत असताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएमएमटी) येथून कल्याणकडे जाणाऱ्या एका लोकलची धडक ३५/१०६ किलोमीटर रेल्वे मार्गावर त्यांना बसली. या धडकेत गंभीर जखमी झाल्यानंतर राजपूत खाली कोसळले. त्यावेळी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती.
ज्या मुलीला त्यांनी ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलमध्ये सोडले, ती लोकलही या अपघातामुळे काही काळ पुढे गेली नाही. त्यामुळे गर्दी कशामुळे झाली, हे पाहण्यासाठी लोकलमधून उतरुन या मुलीने पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आपल्याच वडिलांना लोकलची धडक बसल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने तशाही अवस्थेत मदतीसाठी धावा केला. त्यांना रेल्वे पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच राजपूत यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घाेषित केले. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.