मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने अनधिकृत शाळांची यादी जाहीर करून देखील काही अनधिकृत शाळा सुरूच आहेत . गुन्हे दाखल करून त्या शाळा बंद करण्याच्या कारवाई ऐवजी महिन्या भराने पालिकेला, सदर शाळेत प्रवेश घेऊ नये असे फलक शाळांच्या बाहेर लावण्याची जाग आली आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शहरातील अनधिकृत शाळांची यादी मे महिन्याच्या अखेरीस प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली. भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक भागात नाईन प्लॅनेट पूर्व प्राथमिक शाळा व प्रशिक स्पेशल स्कुल, गोडदेव नाका येथील बॉर्डर हायस्कुल, पेणकरपाड्यातील सेंट डॅनियल स्कुल , काशीमीरा येथील ट्रिनिटी पब्लिक स्कुल , मीरारोडच्या मंगल नगर भागातील अभिलाषा हायस्कुल व नया नगर मधील इक्रा इस्लामिक स्कुल ह्या ७ शाळा अनधिकृत म्हणून जाहीर केल्या.
अनधिकृत प्राथमिक शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश घेवु नये. प्रवेश घेतल्यास अशा पाल्यांच्या शैक्षणिक नुकसानास संबंधित पालक जबाबदार राहतील. महानगरपालिका शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही असे असे पालिकेने प्रसिद्धी नमूद केले. तर शाळेच्या व्यवस्थापनाने त्यांची अनधिकृत शाळा तात्काळ बंद करावी, अन्यथा शासना कडून मान्यता घ्यावी. व्यवस्थापनाने शाळा बंद न केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहितानुसार फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असा इशारा सुद्धा तत्कालीन शिक्षण विभागाच्या सहायक आयुक्त प्रियांका भोसले यांनी दिला होता. परंतु अनधिकृत शाळा सुरूच असताना अद्याप महापालिकेने शाळा बंद तर केल्या नाहीच शिवाय गुन्हा दाखल करण्यास सुद्धा टाळाटाळ चालवली असल्याचे आरोप होत आहेत. तर अनधिकृत शाळा सुरु होऊन आणि पालकांनी आधीच पाल्यांचे प्रवेश घेतलेले असताना ठोस कारवाई करण्या ऐवजी महापालिकेने आता अनधिकृत शाळांच्या बाहेर फलक लावले आहेत. त्या फलकांवर सदर शाळा अनधिकृत असल्याचे नमूद करत पालकांनी ह्या शाळेत पाल्यांचे प्रवेश घेऊ नये असे आवाहन पालिकेने केले आहे. अनधिकृत शाळा लवकर जाहीर केल्या नाहीत . अनधिकृत शाळा जाहीर करून त्यापैकी काही बंद न झाल्याने गुन्हे दाखल केले नाहीत. आता शाळा सुरु होऊन महिना झाल्या नंतर त्या ठिकाणी पालिका फलक लावत असल्याने एकूणच पालिकेच्या भोंगळ कारभारा वर टीका होत आहे.