मीरारोड- मीरा भाईंदर शहरात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आदींचा वापर महापालिकेच्या वरदहस्तमुळे राजरोस सुरु असून त्यावर ठोस कारवाई करण्याऐवजी महापालिका मात्र देखाव्यांवर भर देत आहे. पालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या राक्षसास शहरात फिरवण्यास सुरवात केली आहे.
प्लास्टिक पिशव्यांसह कंटेनर, चमचे, ग्लास, स्ट्रॉ आदी विविध प्लास्टिक वस्तूंवर केंद्र व राज्य शासनाने बंदी घातली आहे. मीरा भाईंदर मध्ये मात्र सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आदींचा वापर, विक्री जोरात सुरु आहे. महापालिकेच्या कर्मचारी व अधिकारी हे तक्रार आली वा बातमी आली पुरता कारवाईचा देखावा करतात.
कारवाई नियमित व व्यापक होत नाही. ज्या भागात प्लास्टिक पिशव्या आदी उघडपणे मिळत आहेत त्या त्या भागातील स्वच्छता निरीक्षक, फेरीवाला पथक आदींवर जबाबदारी निश्चित करून निलंबना सह कठोर प्रशासकीय कारवाई पालिकेचे वरिष्ठ अधिकारी करत नाहीत . तर प्लास्टिक विक्रेते व घाऊक विक्रेते आदीं कडून पालिकेला हप्ते पोहचत असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे.
एकीकडे प्लास्टिक पिशव्या आदींवर कठोर कारवाई करण्या ऐवजी महापालिका केवळ दिखावा म्हणून जनजागृती व आवाहन करण्यासारखे गेल्या अनेक वर्षां पासून फोल ठरलेले प्रकार सातत्याने करत आहे . आता सुद्धा पालिकेने जनजागृती साठी प्लास्टिक पिशव्या परीक्षण केलेला राक्षस जनजागृतीसाठी शहरात उतरवला आहे. हा प्लास्टिक रुपी राक्षस पृथ्वी गिळंकृत करत असल्याचे दाखवले जात आहे. रस्त्ये व प्रमुख सार्वजानिक ठिकाणी प्लास्टिकचा हा राक्षस लोक कुतूहलाने पहात आहेत. तर काही जण खिल्ली उडवत आहेत.
प्लास्टिकचा वापर हा केवळ मनुष्य वा शहरासाठीच नव्हे तर संपूर्ण पृथ्वी साठी घातक असल्याने लोकांनी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आदींचा वापर टाळावा यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे. प्लास्टिक हे मानवी आरोग्यास घातक असून त्यामुळे भटक्या गाई व अन्य प्राण्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. प्लास्टिक मुळे नाले - खाड्या तुंबून पूरस्थिती वाढत आहे . त्यामुळे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक वस्तूंचा वापर बंद करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.