ठाणे: मोर्चे, आंदोलने काढणाऱ्यांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तणावाची परिस्थितीही कौशल्याने हाताळणारे ठाणे शहर आयुक्तालयाच्या विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे यांचा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते सोमवारी विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर अनेक संस्था, संघटना आणि विविध राजकीय पक्षांचे मोर्चे येतात. तसेच अनेक आंदोलनेही होत असतात. अशाप्रसंगी आंदोलनकर्ते आणि जिल्हाधिकारी प्रशासन यांच्यात योग्य समन्वय साधणे आवश्यक असते. प्रशासन आणि मोर्चेकरांमध्ये वाद निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये हे पाहणेही महत्वाचे असते. अशा वेळी पोलीस आणि प्रशासनाच्या बाजूने शिंदे यांनी मोलाचे कार्य केले आहे. वेळोवेळी आंदोलनकर्ते आणि मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भेट घालून त्यामाध्यमातून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, आंदोलने येण्याआधीच त्यांची माहिती प्रशासनाला कळवून शासनाप्रती कर्तव्य बजावले आहे. शिंदे यांनी कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडल्याचा उल्लेख करुन जिल्हाधिकारी शिनगारे यांनी शिंदे यांचा सन्मान केला.