ठाणे/नवी मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेला महागात पडली आहे. केतकीला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस केतकीच्या पोस्टचा तपास करत आहेत. ठाणे पोलीस आज केतकी चितळेला घेऊन तिच्या नवी मुंबईत असलेल्या घराकडे रवाना झाले. केतकीच्या घरातून लॅपटॉप आणि इतर कागदपत्र घेण्यासाठी पोलिसांची टीम रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे सायबर विभागाकडे तक्रारी दाखल केली.
शनिवारी रात्री ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि कृष्णा कोकणी यांच्या पथकाने तिला अटक केली होती. रविवारी सुटीच्या न्यायालयात पोलिसांनी तिला हजर केले. यावेळी तिने आपली बाजू मांडण्यासाठी वकिलाची नियुक्ती करण्याऐवजी स्वत:च आपली बाजू न्यायालयासमोर मांडली.
सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नाही का?, असा सवाल केतकीने उपस्थित केला. तसेच मी कोणी राजकीय नेता नाही की, माझ्या लिखाणाने लगेच कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. मी सामान्य व्यक्ती आहे. जी पोस्ट केली ती एक प्रतिक्रिया होती. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच एक भाग असल्याचा दावाही केतकीने केला, तसेच ही पोस्ट स्वखुशीने केल्याचेही तिने यावेळी स्पष्ट केले.