जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: रेल्वे स्थानकाकडे दुचाकीवरून निघालेल्या पिता पुत्राच्या माेटारसायकलला पाठीमागून एका खासगी बसने जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कॅडबरी जंक्शन, पूर्व द्रुतगती महामार्गावर घडली. या घटनेत हिरानंदानी येथील राकेश बंगेरा (५२) यांचा मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा विशाल (१७) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्याने दिली.
पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट येथील राकेश बंगेरा हे आपला मुलगा विशाल याच्या सोबत दुचाकीवरून हिरानंदानी इस्टेट,पातलीपाडा येथून ठाणे रेल्वे स्थानकाकडे निघाले होते. ते दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कॅडबरी जंक्शन, पूर्व द्रुतगती महामार्गने जाताना,पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका खासगी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये ते दोघे बापलेक खाली काेसळून जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस तसेच राबोडी पोलिसांनी धाव घेतली. यावेळी, अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या राकेश यांना गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूवीर्च त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. यात त्यांचा मुलगा विशाल जखमी झाला असून त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.