नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: महानगरपालिकेतील पाणी पुरवठा वॉलमन,पाईप लाईन,फिल्टर विभागात ठेकेदारा मार्फत काम करणाऱ्या १३३ कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याबरोबरच या कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या वतीने महानगर पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी ठिय्या आंदोलन केले.
श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर,जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हा पदाधिकारी संगीता भोमटे, प्रमोद पवार, सुनील लोणे, सागर देसाक, आशा भोईर, महेंद्र निरगुडा, मुकेश भांगरे, हिरामण गुळवी,तानाजी लहांगे यांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता.
महापालिकेतील पाणी पुरवठा विभागात पाइपलाइन दुरुस्ती,बोअर वेल दुरुस्ती, वॉल मन ही कामे करण्याकरीता ठेकेदार नियुक्त केले आहेत.मे. बुबेर कंट्रक्शन,मे.राम कोरे,मे.जखनूस कंट्रक्शन आणि मे.बाबुलाल पटेल या ठेकेदारांकडुन हि सर्व काम करून घेतले जात असताना काम करणाऱ्या कामगारांची तुटपुंजे वेतन देऊन आर्थिक कुचंबणा केली जात होती.त्या विरोधात आंदोलन करून सुध्दा या कामगारांना किमान वेतनातील फरक देण्यात आलेला नाही. तर मे.बरकत कंट्रक्शन या ठेकेदाराकडुन कंत्राटी कामगारांना किमान वेतन, पगाराची स्लीप, ओळखपत्र, किमान वेतनातील फरक, दिवाळी बोनस यापैकी कोणतीच सुविधा देण्यात आलेली नाही. ठेकेदारांना पालिकेकडून वेळच्यावेळी पैसे देऊनही अनेक कामगारांचे वेतन दोन ते तीन महिने अडवून ठेवले जातात.या विरोधात हे उग्र ठिय्या आंदोलन पालिका मुख्यालय समोर करण्यात आले.सकाळी साडेदहा ते तीन वाजे पर्यंत सुरू राहिलेल्या या आंदोलनानंतर श्रमजीवीचे शिष्टमंडळ चर्चेसाठी मुख्यालयात गेले.