नितीन पंडित, भिवंडी : मुंबई बडोदरा महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधीत झाल्या आहेत. या रस्त्यांसाठी जमीन भूसंपादन केलेल्या अनेक बाधित शेतकऱ्यांना आज ही जमिनीचा मोबदला मिळालेला नाही तर तर काही शेतक-यांचे बायोमॅट्रीक होऊन संपादनाचा मोबदला दिला गेलेला नाही.या मुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा आक्रोश असून श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात शिरून ठिय्या आंदोलन सुरू केले.तेथे आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.या अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली होती.
यासंदर्भात उप विभागीय अधिकारी कार्यालयात प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल तीन तास चर्चा सुरू राहिली.या आंदोलनात राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर,संघटनेचे पदाधिकारी दशरथ भालके,संगीता भोमटे,जया पारधी,प्रमोद पवार,हिरामण गुळवी,सुनील लोणे,सागर देसक यांसह असंख्य कार्यकर्ते स्त्री पुरुष सहभागी झाले होते.
मुंबई बदोदरा रस्त्यात बाधित झालेले वडपे येथील आदिवासी शेतकरी कान्हु पदू डुकले,अर्जुन गंगाराम सापटे, इंदुबाई मारुती माळकरी,मौजे दुगाड येथील कृष्णा रावजी उंबरसाड़ा,संगिता मधुकर उंबरसाडा अशा अनेक शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नसून, अनेक शेतकऱ्यांना बायोमॅट्रीक झाले असून ही संपादनाचा मोबदला दिला गेला नाही. या बाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करून ही न्याय मिळत नसल्याने श्रमजीवी संघटनेने ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता.
कार्यालया समोरील उड्डाणपूला खालील रस्त्यावर आंदोलन सुरू असतानाच अनेक कार्यकर्ते अचानक कार्यालय आवारात दाखल झाले व त्यानंतर त्यांनी अचानक घोषणाबाजी करीत कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजीस सुरवात केली.त्यानंतर उपविभागीय अधिकारी अमित सानप यांनी सर्व आंदोलनकर्त्यांना कार्यालय परिसरात बसण्याची व्यवस्था केल्या नंतर शिष्टमंडळाने निवेदन देऊन चर्चा केली.