सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४ गुरुनानक शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गुलमोहरचे जुने झाड बुधवारी सकाळी १० वाजता बीएसपी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रा. प्रशांत इंगळे यांच्या घरावर पडले. यामध्ये घराचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान पडलेली झाड रस्त्यातून उचलण्याचे काम महापालिका अग्निशमन विभागाचे कर्मचारी करीत होते. त्यावेळी कामगारांच्या हलगर्जीपणामुळे झाडा शेजारील स्ट्रीट लाईटच्या एका खांब एका शाळेत जाणाऱ्या मुलीच्या अंगावर पडला. त्यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली असून तीला उपचारासाठी धन्वंतरी रुग्णालयात हलविण्यात आले.
लालचक्की चौकातील धनवंतरी हॉस्पिटल मध्ये मुलीची चौकाशी व प्राथमिक उपचार करू सिटीस्कॅन काढण्यास सांगितले. मुलीचे नाव निशा गुप्ता असून ती महापालिकेच्या शाळेत इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत आहे. गुलमोहराचे झाड धोकादायक झाले असून ते केंव्हाही पडून मोठी दुर्घटना होईल. त्यामुळे झाड हटाव अथवा तोडून टाकण्याची मागणी प्रा. प्रशांत इंगळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी प्रभाग समिती क्रं-४ च्या कार्यालयात केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने, ही घटना घडली. हा रस्ता वर्दळीचा असून येथूनच शाळेकरी मुले शाळेत जाणे-येणे करतात. सुदैवाने झाड पडले. त्यावेळी कोणी झाडा खालून जात नोव्हते. झालेल्या घटने बद्दल स्थानिक नागरिक संतप्त होते.
यावेळी पाहणी करण्यासाठी आलेल्या सहायक आयुक्त महेंद्र पंजाबी यांना जबाबदार धरून कारवाईची मागणी केली. यावेळी पंजाबी यांनी येथून काढता पाय घेतला. याबाबत अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांच्याशी संपर्क केला असता, पडलेल्या झाडाची फांदी स्ट्रीट लाईटच्या खांबावर पडल्याने खांब रस्त्यावर पडला. असे सांगितले. रस्त्यासह घरावर पडलेले झाड बाजूला करतांना, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता बंद केला नोव्हता. त्यामुळे शाळेकरी मुलांसह नागरिकाची ये-जा करीत होते. त्यावेळी पडलेल्या झाडा जवळील स्ट्रीट लाईट खांब अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पडल्याने, शाळेकरी मुलगी गंभीर जखमी झाली.