ठाणे :
कळवा येथील मनिषानगर भागातील विक्रांत/४३ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका सदनिकेचा स्लॅब कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेत तिघे रहिवाशी जखमी झाले. इमारतीच्या तळ मजल्यावरील सहा दुकाने आणि पहिल्या मजल्यावरील स्लॅब पडलेली सदनिका बंद केली असून संपूर्ण इमारतीमध्ये राहणाºया २० कुटूंबीयांसह सहा दुकाने रिक्त करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत.
विक्रांत/४३ ही तळ अधिक तीन मजली इमारत असून ती ३८ वर्षे जुनी आहे या इमारतीच्या तळ मजल्यावर सहा दुकाने आणि दोन सदनिका आहेत. इतर प्रत्येक मजल्यावर सहा सदनिका अशा २० सदनिका आहेत. पहिल्या मजल्यावरील सदनिका १०६ क्रमांकाच्या सदनिकेत गणेश धामणे हे वास्तव्याला आहेत. त्यांच्सदनिकेचा स्लॅब तळ मल्यावरील हरून हकीम यांच्या ग्लोबल ब्युटी सलूनवर सकाळी १०.३७ वाजताच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत आयुष धामने (२०), कादिर सलमानी ( १९) आणि पार्थ निलेश पाटेकर (१६) हे तिघे जखमी झाले. आयुष हा पहिल्या मजल्यावरील १०६ क्रमांकाच्या सदनिकेत वास्तव्याला असून त्याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तर याच सदनिकेच्या खाली असलेल्या सलूनच्या दुकानात कादीर हा काम करतो. त्याच्याही हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. पार्थ पाटेकर हा सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेला होता. त्याच्या डोळ्याला आणि पाठीला दुखापत झाली आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी कळव्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे उपायुक्त गजानन गोदापुरे, अग्निशमन अधिकारी, सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर, महेश आहेर तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन इमारतीची पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून उपायुक्त गोदापुरे यांच्या आदेशानुसार या इमारतीच्या तळ मजल्यावरील सहा दुकाने आणि पहिल्या मजल्यावरील स्लॅब पडलेल्या सदनिका बंद केली असून संपूर्ण इमारतीमधील रहिवाशांना सदनिका तातडीने खाली करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत.