ठाणे : महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचवावा आणि त्यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे यासाठी शुक्रवारी सकाळी संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात एकाचवेळी विशेष सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कळवा येथे सहभाग घेतला. कळवा येथील ९० फुटी रस्ता येथे सुरू असलेल्या स्वच्छतेची आयुक्तांनी पाहणी केली. त्यानंतर, त्यांनी खारेगाव येथील तलावाची पाहणी केली. तेथे असलेल्या नागरिकांची संवाद साधून शौचालय, स्वच्छता याबद्दल त्यांची मते जाणून घेतली.
या मोहिमेचे संयोजन करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीची जबाबदारी संबंधित सहायक आयुक्त यांच्यावर होती. तर, सर्व यंत्रणांचा समन्वय करण्यासाठी आयुक्तांच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रभागासाठी एक उपायुक्त नियुक्त करण्यात आले होते. त्यानुसार, वागळे इस्टेटसाठी अनघा कदम, वर्तकनगरसाठी वर्षा दीक्षित, कोपरी-नौपाडासाठी शंकर पाटोळे, माजिवडा-मानपाडासाठी दिनेश तायडे, कळव्यासाठी उमेश बिरारी, उथळसरसाठी जी. जी. गोदेपूरे, लोकमान्य - सावरकर नगर साठी महादेव रोडगे, मुंब्र्यासाठी मनीष जोशी आणि दिव्यासाठी सचिन पवार यांच्यावर समन्वयाची जबाबदारी देण्यात आली होती.
या सफाई मोहिमेत दैंनदिन साफसफाई सोबत मोठे आणि अंतर्गत रस्ते यांची सर्वंकष सफाई, पदपथ, रस्ते दुभाजक यांची सफाई करण्यावर भर देण्यात आला. रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला राडारोडा, झाडाच्या फांद्या, कचरा उचलण्यात आला. कळवा येथील ९० फुटी रस्त्याचे रुंदीकरण तसेच सुशोभीकरण ही कामे प्रस्तावित आहेत. त्या कामांना गती देऊन रस्त्याची स्थिती पादचारी स्नेही करावी, असे राव यांनी कार्यकारी अभियंता यांना सांगितले.नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन
या रस्त्यावर पादचारी, सकाळी फिरायला येणारे नागरिक यांना सोयीचे होईल अशा पद्धतीने काम व्हावे. दोन्ही बाजूला हरित मार्ग, रस्त्याच्या दुभाजकावर हरित पट्टा तयार करावा. सुशोभीकरण करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला ही घेण्यात यावा, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. हा रस्ता पुढे महामार्गाला जोडला जाणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच, फेरीवाले, त्यांच्याकडून टाकला जाणारा कचरा, अनधिकृत पार्किंग आदी समस्याही मांडल्या. याच भागात असलेल्या खुल्या प्रेक्षागृहाचीही आयुक्त यांनी नागरिकांसह पाहणी केली. नागरिकांनी या भागात कचरा पडणार नाही यासाठी सतर्क राहावे. महापालिकेचे कर्मचारी त्यांचे काम करतीलच, पण कचरा टाकण्याच्या नवीन जागा तयार होणार नाहीत, याची दक्षता स्थानिकांनीही घ्यावी असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.