ठाणे :
दिवंगत ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वंचितांचा रंगमंचाचे नववे पर्व येत्या शनिवारी २४ डिसेंबर रोजी मनोरुग्णालयाजवळील ठाणे महानगर पालिकेच्या दादा कोंडके अॅंफी थिएटरमध्ये सादर होणार आहे. ठाण्यातील मानपाडा, येऊर, सावरकर नगर, कशेळी, कळवा, राबोडी, मनोरमा नगर आदि वस्तीमधील मुली मुले सहभागी होणार आहेत.
समता विचार प्रसारक संस्था आयोजित दुपारी ४ वाजता होणार्या या नाट्यजल्लोषात ‘बोध जुना – शोध नवा’ या थीमवर आधारित नाटिका सादर करणार आहेत. लहान मुलांसाठी असलेल्या ससा कासव, चल रे भोपळ्या टुणूक, टुणूक , गुरुचे महत्व, मुलींना हवे शिक्षण, हिंसे विरुद्ध आवाज उठवा अशा बोध कथा आजच्या काळासाठी कशा प्रकारे लागू होऊ शकतात अशा विषयावर मुलांनी स्वतः लिहिलेल्या आणि बसवलेल्या नाटिका सादर होणार आहेत. वंचित समुहांच्या मुलांना आणि मुलींना त्यांचे विचार मांडण्यासाठी आणि त्यांना नाट्य या कलेचा अनुभव मिळावा यासाठी मतकरी सरांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला ठाण्यातील वस्ती वस्ती मधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या नऊ वर्षात या रंगमंचावर कार्यरत असलेल्या मुलांना नाट्य सिने क्षेत्रातही संधी मिळत आहे, त्यांच्या प्रतिभेला या क्षेत्राचे दालन खुले होत आहे. मतकरी सरांच्या अकल्पित निधनानंतर प्रतिभाताई मतकरी, सुप्रिया मतकरी विनोद यांनी या उपक्रमाला सतत मार्गदर्शन करून पाठबळ दिले आहे. या उपक्रमाला ठाणे महानगर पालिकेचा सहयोग नेहमीच मिळत आलेला आहे. दर वर्षी अनेक मान्यवर आणि नाट्यकर्मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. यार्षीही संवेदनशील ठाणेकर नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी केले आहे.